पुणे : तर अवसायकावर गुन्हा दाखल करू | पुढारी

पुणे : तर अवसायकावर गुन्हा दाखल करू

पुणे; पुढारी वृत्तसेवा: थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याचे लेखापरीक्षण पूर्ण करून दफ्तर व मालमत्तेचा ताबा नियुक्त प्रशासकांना देण्यास राज्य सहकारी बँकेची नकारघंटा कायम आहे. त्यामुळे बँकेचे तत्कालीन अवसायक सतीश एन. साळुंखे यांना नोटीस देण्यात आली असून, त्यांच्याविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक धनंजय डोईफोडे यांनी दिला आहे.

सहसंचालकांनी 12 सप्टेंबर रोजी सांळुखे यांना पत्र दिले आहे. त्यामध्ये हा इशारा देण्यात आला आहे. कारण, राज्य बँकेस थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याचे (ता. हवेली, जि. पुणे) लेखापरीक्षण पूर्ण करून दफ्तर व मालमत्तेचा ताबा बँकेवर नेमण्यात आलेले प्रशासक बी. टी. लावंड यांच्याकडे देण्याबाबत वेळोवेळी कळविण्यात आले होते. तथापि, अद्यापही कारखान्याचे लेखापरीक्षण पूर्ण केलेले नाही. दफ्तर व मालमत्तेचा ताबा लावंड यांच्याकडे न दिल्यामुळे त्यांना प्रशासकाचे काहीही कामकाज करता आलेले नाही.

त्यामुळे यशवंत साखर कारखान्यावरील त्यांची प्रशासक म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्याची विनंती सहसंचालकांकडे 10 ऑगस्टच्या पत्रान्वये केली आहे. या सर्व स्थितीमध्ये यशवंत कारखान्याच्या कामकाजाची जबाबदारी ही साळुंखे यांचीच असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. कारखान्याचे लेखापरीक्षण पूर्ण करून दफ्तराचा ताबा देण्याबाबत कळवूनही लक्ष दिलेले नाही. कारखान्याचे प्रोसिडिंग बुक, कॅशबुक व इतर माहिती आवश्यक कागदपत्रे तपासणीसाठी द्यावीत अन्यथा गुन्हा दाखल करू असा इशारा दिला आहे.

Back to top button