महापालिकेच्या सहा सांडपाणी केंद्रांवर हातोडा! निकषांप्रमाणे प्रक्रिया होत नसल्याचा ठपका | पुढारी

महापालिकेच्या सहा सांडपाणी केंद्रांवर हातोडा! निकषांप्रमाणे प्रक्रिया होत नसल्याचा ठपका

पुणे, पुढारी वृत्तसेवा: प्रदूषण नियंत्रण महामंडळाने घालून दिलेल्या निकषांप्रमाणे सांडपाणी स्वच्छ होत नसल्याने दहापैकी सहा प्रकल्प तोडून नव्याने उभारण्याची शिफारस महापालिकेने नेमलेल्या सल्लागारांनी केली आहे. पुन्हा नव्याने प्रकल्प उभारण्यासाठी जवळपास 450 कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.

सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प दहा वर्षांपेक्षा अधिक जुने असून, त्यात एकूण शहरात तयार होणार्‍या 890 एमएलडी सांडपाण्यापैकी 450 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होते. त्यातच या प्रकल्पात केंद्र शासनाने नव्याने निश्चित केलेल्या निकषानुसार प्रक्रिया होत नाही. त्यामुळे महापालिकेने या प्रकल्पांमध्ये सुधारणा कराव्यात, अशा सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पालिकेस करण्यात आल्या होत्या. त्यानुसार पालिकेने या कामासाठी सल्लागाराची नियुक्ती केली होती. मात्र, दहामधील जवळपास सहा प्रकल्पांचा सुधारणा खर्च नवीन प्रकल्पांपेक्षा अधिक असल्याचे सल्लागाराने सांगितले. त्यामुळे हे प्रकल्प पाडून ते नव्याने विकसित करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. केंद्र व राज्य शासन तसेच महापालिकेच्या निधीतून हे काम करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.

ही आहेत सहा केंद्रे

नायडू हॉस्पिटल, भैरोबानाला, बोपोडी, एरंडवणे, विठ्ठलवाडी आणि नरवीर तानाजीवाडी हे सहा प्रकल्प पाडून नव्याने बांधण्याचे सल्लागाराने सुचविले आहे. महापालिकेकडून मुळा-मुठा नदी संवर्धन प्रकल्पांतर्गत 11 नवीन सांडपाणी शुध्दीकरण केंद्रे बांधली जाणार आहेत.

Back to top button