पुणे : पालिकेच्या 3,267 मिळकतींचे ‘जीआयएस पॉलिगॉन मॅपिंग’ | पुढारी

पुणे : पालिकेच्या 3,267 मिळकतींचे ‘जीआयएस पॉलिगॉन मॅपिंग’

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेच्या मिळकतींवरील अतिक्रमण रोखण्यासाठी आणि सर्वंकष माहिती सहज उपलब्ध होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला जात असून, मालमत्ता व्यवस्थापन विभागाने आतापर्यंत 3,267 मिळकतींचे ‘जीआयएस पॉलिगॉन मॅपिंग’ पूर्ण केले आहे. शहरामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या मालकीच्या किंवा विविध कारणांसाठी संपादित केलेल्या 3 हजार 600 मिळकती आहेत. त्यामध्ये शाळा, रुग्णालये, क्रीडांगणे, उद्याने, सांस्कृतिक भवन, अग्निशमन केंद्र, भाजीमंडई, क्षेत्रीय कार्यालयांच्या इमारती, पाणीपुरवठा केंद्र, स्मशानभूमी, दफनभूमी, मलनिस्सारण प्रकल्प, अ‍ॅमिनिटी स्पेस, चाळ विभागाकडील मिळकती, समाजमंदिरे, अभ्यासिका, ‘आर 7’अंतर्गत तसेच आरक्षणाच्या बदल्यात ताब्यात आलेल्या जागा, विरंगुळा केंद्रे आदी मिळकतींचा समावेश आहे.

मात्र, मिळकतीवर अतिक्रमण होत असल्याने मालमत्ता व व्यवस्थापन विभागाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पॉलिगॉन मॅपिंग सुरू केले आहे. यामध्ये संबंधित मिळकतींचे क्षेत्रफळ, त्याचा अक्षांश आणि रेखांश, याची माहिती नोंदविली जाते. तसेच जागेचे नाव, परिसर, सर्व्हे नंबर याची नोंद ठेवली जाते. ही माहिती सॉफ्टवेअरमध्ये स्टोअर राहते. यामुळे आगामी काळात महापालिकेच्या जागांवर अतिक्रमण होणार नाही. प्रशासनाने अशा 3,267 मिळकतीचे मॅपिंग पूर्ण केले आहे. उर्वरित मिळकतींचे मॅपिंग लवकरच पूर्ण केले जाणार असल्याचे मालमत्ता व व्यवस्थापन विभागाने
सांगितले आहे.

Back to top button