पुणे : अकरावीला प्रवेश नको रे बाबा; एक लाखांवर नोंदणी | पुढारी

पुणे : अकरावीला प्रवेश नको रे बाबा; एक लाखांवर नोंदणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: अकरावी प्रवेशासाठी यंदा 1 लाख 7 हजार 52 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली खरी; परंतु केवळ 73 हजार 146 विद्यार्थ्यांनीच आत्तापर्यंत महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरल्याचे स्पष्ट झाले आहे. 33 हजार 906 विद्यार्थी पहिल्या फेरीपासूनच प्रवेश प्रक्रियेकडे फिरकले नाहीत. अकरावीचे पारंपरिक शिक्षण नको रे बाबा… असे म्हणत त्यांनी आयटीआय किंवा तंत्रशिक्षणाकडे धाव घेतली आहे. अकरावी प्रवेशासाठी आत्तापर्यंत तीन नियमित आणि दोन विशेष फेर्‍या घेण्यात आल्या आहेत.

तर, प्रवेशासाठीची अंतिम तिसरी विशेष फेरी सुरू करण्यात आली आहे. अकरावीसाठी आत्तापर्यंत 71 हजार 31 विद्यार्थ्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला आहे. तर, प्रवेशासाठी अद्यापही 40 हजार 439 जागा उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 1 लाख 11 हजार 470 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी 95 हजार 202 जागा केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे भरल्या जाणार आहेत.

परंतु, यातील केवळ 61 हजार 767 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, कॅपमधीलच तब्बल 33 हजार 435 जागा रिक्त आहेत. तर, कोटा प्रवेशासाठी यंदा 16 हजार 268 जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी 9 हजार 264 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, कोटा प्रवेशाच्या देखील 7 हजार 4 जागा रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थी आता सजग झाले असून, अकरावीचे पारंपरिक शिक्षण घेण्यापेक्षा आयटीआय, तंत्रशिक्षण किंवा कौशल्याभिमुख अभ्यासक्रमांकडे वळत आहे. परिणामी, यंदादेखील अकरावीच्या वर्गांमधील अनेक बाके रिकामीच राहणार आहेत.

अकरावी प्रवेश प्रक्रिया दृष्टिक्षेपात एकूण महाविद्यालये
317
एकूण प्रवेशक्षमता
111470

एकूण नोंदणी
107052
कोटा प्रवेशक्षमता
16268

कोटांतर्गत प्रवेश
9264

कॅप प्रवेशक्षमता
95202

कॅप अंतर्गत अर्ज
73146

एकूण प्रवेश
71031

रिक्त जागा
40439

विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेत नाहीत, याची तीन कारणे मला दिसतात. यातील पहिले कारण म्हणजे विद्यार्थी अकरावीसाठी नोंदणी करतात.परंतु, ते कौशल्य अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याचा दुसरा पर्याय तयार ठेवत असतात. ज्याचा त्यांनी वापर केला असावा, दुसरे कारण विद्यार्थ्यांना विशिष्ट महाविद्यालयात प्रवेश हवा असतो. अजूनही ते आशेवर असतील की ठराविक महाविद्यालयात प्रवेश मिळेल. तिसरे कारण म्हणजे, विद्यार्थी सध्या थेट 17 नंबरचा फॉर्म भरून बारावीची परीक्षा देण्याचा विचार करतात, या तीनच कारणांमुळे विद्यार्थी अकरावी प्रवेशाला प्रतिसाद देत नसल्याचे दिसून येत आहे.

                                – डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय

विद्यार्थी अकरावीसाठी नोंदणी करतात. परंतु आयटीआय किंवा पॉलिटेक्निक किंवा अन्य छोट्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. दुसरे कारण म्हणजे विद्यार्थ्यांना वाटते प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य फेरीत त्यांना हवे ते महाविद्यालय मिळेल. परंतु, यंदा संबंधित फेरी घेण्यात येणार नाही. तर प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना यंदा ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घ्यायचाच असेल, तर सुरू असलेली फेरी ही विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी आहे.
                              – मीना शेंडकर, सचिव, अकरावी प्रवेश प्रक्रिया नियंत्रण समिती

Back to top button