वेल्ह्यात लम्पी रोगाचा शिरकाव; तोरणा खोर्‍यात 200 जनावरांचे लसीकरण | पुढारी

वेल्ह्यात लम्पी रोगाचा शिरकाव; तोरणा खोर्‍यात 200 जनावरांचे लसीकरण

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: वेल्हे तालुक्यात लम्पी रोगाचा शिरकाव झाला असुन तोरणा खोर्‍यातील धानेप येथे एका बैलाला लम्पीची लागण झाल्याने प्रशासनाने साथ रोखण्याच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. धानेप गावासह तोरणा खोर्‍यात शुक्रवारी (दि. 16) 200 जनावरांचे लसीकरण करण्यात आले. वेल्हे तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. भास्कर धुमाळ म्हणाले की, धानेप येथील एका बैलाला लम्पीची लागण झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. अद्याप दुसर्‍या जनावरांना लागण झाली नाही.

त्यामुळे तातडीने जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत शेजारच्या भोर तालुक्यातून 200 जनावरांचे डोस आज घेण्यात आले आहेत. गाय, बैल अशा जनावरांना लम्पी रोगाची लागण होत असल्याने या जनावरांना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. उपलब्ध लस धानेप, विहीर, अंत्रोली व परिसरातील जनावरांना दिली जात आहे. लम्पीची लागण झालेल्या बैलाच्या प्रकृतीत उपचारानंतर सुधारणा झाली आहे. शेतकर्‍यांनी घाबरून न जाता जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन डॉ. धुमाळ यांनी केले आहे.

वेल्हेचे तहसीलदार शिवाजी शिंदे, वेल्हेचे गटविकास अधिकारी पंकज शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांच्यासह पशुवैद्यकीय विभागाने धानेप व परिसरातील शेतकर्‍यांशी संवाद साधला. या वेळी अमोल नलावडे म्हणाले की, ही साथ रोखण्यासाठी जिल्हा परिषदेकडे लसीची मागणी करण्यात आली आहे.

पशुवैद्यकीय पथक खोर्‍यात तळ ठोकून
सकाळपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसात अतिदुर्गम तोरणा खोर्‍यात फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत खेडोपाडी जाऊन जनावरांचे लसीकरण सुरू केले आहे. बहुतांश गाय, बैल अशी जनावरे रानात चारण्यासाठी सोडण्यात आल्याने पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भास्कर धुमाळ, बी. डी. सोरटे, डी. के. खोरे, राहुल बांदल यांच्यासह पशुवैद्यकीय पथक तळ ठोकून आहे.

Back to top button