पुणे : कर्करोगावरील नवीन उपचारपद्धती दिलासादायक; टाटा मेमोरियल सेंटरचे संशोधन | पुढारी

पुणे : कर्करोगावरील नवीन उपचारपद्धती दिलासादायक; टाटा मेमोरियल सेंटरचे संशोधन

पुणे; पुढारी वृत्तसेवा: स्तनांच्या कर्करोगाचे निदान लवकर झालेल्या रुग्णांमध्ये शस्त्रक्रियेपूर्वी लिग्नोकेन औषधाच्या साहाय्याने भूल दिल्यास उपचारांचा खर्च लाखो रुपयांनी कमी होतो आणि कर्करोगाची गाठ पुन्हा होण्याची शक्यताही कमी होते, असे संशोधनाअंती दिसून आले आहे. उपचारपद्धती छोटीशी असली, तरी परिणामकारक असल्याने कर्करोग पुन्हा उद्भवण्याचे प्रमाण चार टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा निष्कर्षात करण्यात आला आहे.

टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी पॅरिसमध्ये सुरू असलेल्या युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलॉजी (इएसएमओ) वैद्यकीय परिषदेमध्ये स्तनांच्या कर्करोगाच्या अभ्यासाचा अहवाल सादर केला. वार्षिक ‘इएसएमओ” परिषद ही जगातील सर्वांत प्रतिष्ठित कर्करोग परिषदांपैकी एक आहे आणि दर वर्षी ती युरोपमध्ये आयोजित केली जाते. कर्करोगावर उपचार करणार्‍या देशांतील रुग्णालयांमधील 11 कर्करोग उपचार केंद्रांवर याबाबतचा अभ्यास करण्यात आला.

तब्बल 11 वर्षे हे संशोधन सुरू होते. शस्त्रक्रियेद्वारे प्राथमिक कर्करोग काढून टाकण्याच्या आधी, दरम्यान आणि नंतर लगेचच एक संधी उपलब्ध असते, जेव्हा कर्करोगविरोधी औषधाने रुग्णाच्या पुढील आयुष्यात पसरणार्‍या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो, असे डॉ. बडवे यांनी सांगितले.

जगभरात ही उपचारपद्धत लागू केल्यास दर वर्षी एक लाखापेक्षा जास्त रुग्णांचे जीव वाचवता येऊ शकतात. शस्त्रक्रियेपूर्वी करण्यात आलेल्या उपचारामुळे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. कर्करोगाच्या नवीन उपचारपद्धतीचा खर्च सामान्यांना परवडेल इतका असतो. रुग्णांना भूल देण्याचे औषधच एका ठराविक मात्रेत दिले जाते आणि ते कर्करोगाला प्रतिबंध म्हणून काम करते. त्यामुळे या पद्धतीचा खर्च हा अक्षरश: शंभर रुपयांच्या आत येतो. कर्करोगाच्या लाखो रुपयांच्या खर्चापुढे हा नगण्य आहे.

                                         – डॉ. राजेंद्र बडवे, संचालक, टाटा मेमोरियल सेंटर

हा अभ्यास स्तनाच्या कर्करोगावरचा प्रभावी उपचाराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. हे संशोधन पुराव्यानिशी सिद्ध करण्यात आले आहे. हा अभ्यास म्हणजे भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. –

                     डॉ. सुदीप गुप्ता, ऑन्कोलॉजीचे प्राध्यापक, टाटा मेमोरियल सेंटर

Back to top button