मोशीतील नालेसफाईकडे दुर्लक्ष | पुढारी

मोशीतील नालेसफाईकडे दुर्लक्ष

मोशी : पुढारी वृत्तसेवा : मोशीत महामार्गालगत असलेल्या नाल्यात राडारोडा तसाच असल्याचे चित्र असून पालिकेने अद्याप नालेसफाई केले नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास नाले तुंबून पाणी थेट महामार्गावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय वाहता प्रवाह बदलून पाणी थेट लगतच्या शेतात घुसण्याची देखील शक्यता आहे. यामुळे भराव वाहून जाण्याची,पाणी रस्त्यावर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

मोशीतील नागेश्वर चौका लगतचा ओढा वगळता इतर ठिकाणी सफाई केल्याचे दिसून येत नसून महामार्गालगत हजारे वस्ती,वाघजाई मंदिर भागातील नाला तर पूर्ण तुंबून गेल्याचे दिसत आहे. आताच पाण्याचे मोठे डबके साचले असून काही दिवसात हीच परस्थिती राहिली तर पाणी महामार्गावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. देहू फाटा चौकातील नाला देखील झाडे – झुडपांनी वेढला गेला असून याठिकाणी तर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असल्याने दुर्गंधी पसरत आहे.

एकंदरीतच पालिकेचे मोशी भागातील नालेसफाईकडे दुर्लक्ष होत असून नागरिकांची नाराजी वाढताना दिसून येत आहे. नालेसफाई नसल्याने पूरसदृश परस्थिती निर्माण होण्याचा धोका अधिक वाढला आहे यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

 

Back to top button