पुरंदर विमानतळाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती | पुढारी

पुरंदर विमानतळाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुरंदर विमानतळ उभारण्याचे काम औद्योगिक महामंडळ करणार की विमानतळ प्राधिकरण करणार, हा निर्णय आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच पुण्यामध्ये जुन्या जागेवरच पुरंदरचे विमानतळ होणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे आता विमानतळ कोणी करायचे, याविषयी प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू
झाली आहे.

पुरंदर विमानतळाबाबत दोन वर्षांपासून कोणत्याही प्रकारच्या हालचाली झाल्या नाहीत. आता त्या प्रकल्पाला पुन्हा हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. यासंदर्भात लवकरच वरिष्ठ अधिकार्‍यांची चर्चा होऊन कामाची दिशा निश्चित होणार आहे. उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार, भूसंपादनाची प्रत्यक्ष कार्यवाही जिल्हाधिकारी करतील. त्यावर विभागीय आयुक्त लक्ष ठेवतील.

भूसंपादन खरेदीने करावे की कायद्यानुसार याचा निर्णय जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्याशी चर्चा करून एमएडीसीला घ्यावा लागणार आहे. त्यामुळे ’एमएडीसी’कडून लवकरच राज्य सरकारला विमानतळ उभारणीचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे.

पुरंदर विमानतळाच्या उभारणीत एमएडीसीची व एमआयडीसीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. याबाबत आता मुख्यमंत्री निर्णय घेणार आहेत. त्यानंतर भूसंपादन कशा पद्धतीने करावे, याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडून निर्णय घेण्यात येईल.

भूसंपादन होणारे क्षेत्र
गावांचे नाव क्षेत्र (हेक्टर)
पारगाव मेमाणे 1037
उदाचीवाडी 261
मुंजवडी 143
एखतपूर 271
खानवडी 484
कुंभारवळण 351
वनपुरी 339
एकूण 2,832

 

Back to top button