बारामतीचा गड 2024 ला जिंकणार : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

बारामतीचा गड 2024 ला जिंकणार : चंद्रशेखर बावनकुळे

बारामती; पुढारी वृत्तसेवा :  बारामती हा पवारांचा गड मानला जातो. परंतु, देशात असे अनेक गड उद्ध्वस्त झाले आहेत. बारामतीचा गडही 2024 ला भाजप जिंकेल, असा विश्‍वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे व्यक्‍त केला. बावनकुळे बुधवारी बारामती दौर्‍यावर आले आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

देशात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांची मोट बांधली जात असल्याच्या प्रश्‍नावर बावनकुळे म्हणाले, पवार यांचा तो अधिकार आहे. प्रत्येकाला आपले संघटन वाढविण्याचा अधिकार असतो. परंतु, राज्यात राष्ट्रवादीचा इतिहास पाहिला, तर आठ जागांच्या वर हा पक्ष गेलेला नाही. आमचा पक्ष जगातील व देशातील क्रमांक एकचा पक्ष आहे. आम्ही कोणाविरुद्ध लढतोय, हा अजेंडा नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजप बारामतीची जागा कोणत्याही स्थितीत निवडून आणेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची वारंवार प्रशंसा करत असताना बारामती टार्गेट का, या प्रश्‍नावर ते म्हणाले, एखाद्याने चांगले काम केले; तर त्यांची प्रशंसा करण्यात गैर काय? परंतु बारामती मतदारसंघात अजूनही 45 टक्के जनता उपेक्षित आहे. ओबीसी, मराठा, धनगर समाजाचे प्रश्‍न कायम आहेत.

देशात 400 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट

बारामतीत कोणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा घेतील. बारामतीसह देशातील 400 पेक्षा अधिक व राज्यात 45 पेक्षा अधिक लोकसभेच्या जागा आम्ही जिंकू. परंतु, आजवर झाली नाही अशी लढत बारामतीत 2024 मध्ये पाहायला मिळेल, असे बावनकुळे म्हणाले.

विखे-पाटलांकडे जबाबदारी

बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी राधाकृष्ण विखे-पाटील सांभाळतील. संघटनात्मक पातळीवरील जबाबदारी आमदार राम शिंदे यांच्याकडे राहील. दर तीन महिन्यांनी बारामतीत येणार असल्याचे बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

पुढील निवडणुकीत राष्ट्रवादीचे विसर्जन

दरम्यान, भाजपच्या संघटनात्मक बैठकीत बोलताना बावनकुळे यांनी, 2024 च्या निवडणुकीत येथून एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य घेत बारामतीची जागा जिंकू. पुढील निवडणुकीत राष्ट्रवादीचे विसर्जन नक्‍की होईल, असा विश्‍वास व्यक्‍त केला. लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत सभा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्रीलंकेच्या अध्यक्षासारखे पवारांना पळून जावे लागेल : पडळकर

भाजपच्या संघटनात्मक आढावा बैठकीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबीयांवर जोरदार निशाणा साधला. फडणवीस यांना सत्ता मिळू नये, अशी पवारांची मनोमन इच्छा होती. परंतु, फडणवीस यांनी त्यावर मात केली, हे शरद पवार यांचे खरे दुःख आहे. शरद पवार यांना आता श्रीलंकेतील राष्ट्राध्यक्षाला जसे पळून जावे लागले होते, तसे जावे लागेल. बारामती तुम्ही पवारांचा बालेकिल्‍ला कसे म्हणता; ही तर नुसती टेकडी आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बिनटाक्याचे ऑपरेशन करणार्‍या डॉक्टर आहेत. त्या बारामतीचे ऑपरेशन कधी करतील हे पवारांना कळायचेही नाही, असे पडळकर म्हणाले.

Back to top button