पिंपरी : महापालिकेच्या शाळांवर कोट्यवधींच्या खर्चाचा सपाटा | पुढारी

पिंपरी : महापालिकेच्या शाळांवर कोट्यवधींच्या खर्चाचा सपाटा

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांवर दरवर्षी कोट्यवधींचा खर्च करूनही शैक्षणिक दर्जा सुधारत नसल्याची स्थिती आहे. असे असताना आता बोधचिन्ह, घोषवाक्य, नाव व एकसारखे दिशादर्शक चिन्हे लावण्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला जाणार आहे. त्याला सर्वसाधारण सभेची आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी (दि. 6) मान्यता दिली. पालिकेच्या शाळांवर दरवर्षी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो.

विद्यार्थ्यांना गणवेश, पीटी गणवेश, शूज, सॉक्स, रेनकोट, स्वेटर, दप्तर, पुस्तके व वह्या असे साहित्य दरवर्षी मोफत दिले जाते. तसेच, शाळेची स्वच्छता, रंगरंगोटी, दुरुस्ती काम, शिक्षक व कर्मचार्‍यांचे वेतन आदींवर वारेमाप खर्च केला जात आहे. आता, बोधचिन्ह, घोषवाक्य, नाव व एकसारखे दिशादर्शक चिन्हाचे फलक लावले जाणार आहे. त्यावर कोट्यवधींचा खर्च केला जाणार आहे. त्याला आयुक्तांनी मान्यता दिली आहे. पालिकेच्या माध्यमिक विभागाच्या 18 शाळा आहेत. प्राथमिक विभागाच्या 110 शाळा आणि 207 बालवाड्या असे एकूण 317 शाळा आहेत.

ज्ञानमेव शक्ती : बोधवाक्य
या सर्व शाळांसाठी बोधचिन्ह, घोषवाक्य करून, नाव व एकसारखे दिशादर्शक चिन्हाचे फलक लावण्यास येणार आहे. पीसीएमसी पब्लिक स्कूल असे नामफलक लावण्यात येणार आहेत. ‘ज्ञानमेव शक्ती’ हे घोषवाक्य असणार आहे. सर्व शाळेशेजारच्या रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. शाळा कार्यालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय, मुला-मुलींचे शौचालय असे एकाच आकाराचे व एकाच रंगसंगतीचे विविध चिन्हांचे फलक लावण्यात येणार आहेत. त्यासाठी कोट्यवधींचा खर्च अपेक्षित आहे. त्याला सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाली आहे.

पालिकेच्या मराठी शाळेवर इंग्रजी फलक :
पालिकेच्या बहुतांश शाळा या मराठी माध्यमाच्या आहेत. सर्व शाळा इमारतींवर पिंपरी-चिंचवड महापालिका शाळा असे नामफलक आहेत. आता त्या शाळेवर ‘पीसीएमसी पब्लिक स्कूल’ असे एकसारखे नव्याने फलक लावण्यात येणार आहेत. मराठी शाळेवर इंग्रजी भाषेतील फलकांमुळे मराठी भाषेची गळचेपी होणार आहे.

बोधचिन्ह, घोषवाक्य एकसमान करण्याचा घाट
माध्यमिक विभागाच्या शाळा
18

प्राथमिक विभागाच्या शाळा
110

बालवाड्या
207

Back to top button