पानशेतला बिबट्याच्या दहशतीने स्थलांतर | पुढारी

पानशेतला बिबट्याच्या दहशतीने स्थलांतर

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: पानशेत भागातील बिबट्याच्या दहशतीमुळे डोंगर माथ्यावरील शेतकरी कुटुंबांनी स्थलांतर केले आहे, तसेच रानात जनावरे चारणेही बंद केले आहे. वनविभागाने बिबट्यांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक शेतकरी शंकरराव निवंगुणे यांनी केली आहे. तर, वनविभागाने शेतकर्‍यांना आवश्यक खबरदारीचे आवाहन केले आहे.
वेल्हे व हवेली तालुक्याच्या हद्दीवरील पानशेतजवळील आंबी (ता. हवेली), तसेच वेल्हे तालुक्यातील रुळे, कादवेसह पानशेत, वरसगाव धरण खोर्‍यात बिबट्याचा वावर सुरू आहे. गेल्या आठवड्यात रुळे येथील एका फार्म हाऊसमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला.

त्या वेळी सुदैवाने वयोवृद्ध दांपत्याचे प्राण वाचले. आंबी येथे दोन आठवड्यात शेळीसह चार जनावरांचा फडशा बिबट्याने पाडला. आंबी, रुळे परिसरात 3 ते 5 बिबट्यांचे वास्तव्य आहे. आंबी येथील वरपेवाडी, म्हस्कोबा वन, कादवे ते रुळे हद्दीपर्यंत बिबट्याने ठाण मांडले आहे. बिबटे शेतकर्‍यांची पाळीव जनावरे, रान डुक्कर, भेकर, मोकाट कुत्री यांना भक्ष करीत आहेत. बिबट्याच्या दहशतीमुळे आंबी, रुळे व परिसरात उंच डोंगर, माळरानावरील नाचणी, वरईची शेती करणे बहुतांश शेतकर्‍यांनी बंद केले आहे.

त्यामुळे डोंगर, माळरानात झाडी-झुडपांची जंगले तयार झाली आहेत. आंबी येथे वनविभाग अथवा सरकारी क्षेत्र नाही. डोंगर जंगले खासगी मालकीची आहेत. ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे वन्यजिवांना पाणी आणि खाद्य मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहे. त्यामुळे बिबट्यासह वन्यजिवांचा वावर वाढला आहे. आंबी येथील डोंगर माथ्यावर राहणारे वृद्ध शेतकरी धोंडिबा बाबू ढेबे, बापू ढेबे आदी तीन कुटुंबांनी बिबट्याच्या भीतीने स्थलांतर केले आहे. सर्व कुटुंबे वरपेवाडी येथे स्थायिक झाली आहेत.

अशीच स्थिती रुळे येथील डोंगर माथ्यावरील कुटुंबांची झाली आहे. रुळे येथील शेतकरी तानाजी मरगळे म्हणाले, की उभी शेती सोडून गाई, म्हशी जनावरे घेऊन कोठे जावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बिबट्याच्या भीतीमुळे रुळे, मोरदरी, तिडकेवाडी आदी ठिकाणी शेतकर्‍यांनी रानात जनावरे चारणेही बंद केले आहे.

सिंहगड वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी बाळासाहेब लटके म्हणाले, की आंबी येथे बिबट्याचा वावर आहे. बिबट्या अथवा हिंस्र वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची नुकसान भरपाई शेतकर्‍यांना दिली जात आहे. मात्र, अद्यापही त्याच्या पाऊलखुणा सापडल्या नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांना खबरदारीचे आवाहन केले आहे.

 

Back to top button