पुणे : उत्सवकाळात मोबाईल चोरटे सुसाट; पन्नास ते साठ मोबाईल गहाळ झाल्याच्या दररोज तक्रारी | पुढारी

पुणे : उत्सवकाळात मोबाईल चोरटे सुसाट; पन्नास ते साठ मोबाईल गहाळ झाल्याच्या दररोज तक्रारी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: उत्सवकाळात मोबाईल चोरटे चांगलेच सुसाट सुटल्याचे चित्र आहे. गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी मध्यवस्तीत गर्दी वाढते आहे. त्याच संधीचा फायदा घेत चोरटे मोबाईल लंपास करीत आहेत. हे चोरटे एवढे तरबेज आहेत की, काही सेकंदांत नागरिकांच्या खिशातून मोबाईल लंपास करीत आहेत. त्यामुळे देखावे पाहण्यासाठी जाताना आपला मोबाईल सांभाळा, असे आवाहन करण्याची वेळ आली आहे.

गणेशोत्सवामध्ये गणपती पाहण्यासाठी जोडून आलेल्या शनिवार व रविवारच्या सुटीचा फायदा घेत लाखो भाविकांनी शहरातील मध्यवर्ती भागामध्ये दोन दिवस तुफान गर्दी केली होती. पुणे शहर, जिल्ह्यातूनच नव्हे, तर राज्याच्या ग्रामीण भागातून, परराज्यातूनही काही नागरिक गणेशोत्सव पाहण्यासाठी दाखल झाले आहेत. बहुतांश नागरिक आपल्या कुटुंबीयांसह गणपती पाहण्यास प्राधान्य देत असल्याचे समाधानकारक चित्र यंदा अनुभवायला मिळू लागले आहे.

मात्र, असे असतानाच चोरट्यांच्या चोरी करण्याच्या प्रकारामध्येही वाढ झाल्याची सद्य:स्थिती आहे. गणेशोत्सवामध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन परराज्यातील चोरट्यांच्या टोळ्यादेखील गणेशोत्सवात सक्रिय झाल्या आहेत. त्यानुसार गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून ते सोमवारपर्यंत शहरातून भाविकांचे तब्बल 583 मोबाईल चोरीला गेल्याच्या ऑनलाइन तक्रारी पुणे पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत.

दगडूशेठ हलवाई गणपती ते मंडई या परिसरात दररोज 50 ते 60 मोबाईल चोरीला जात आहेत. अनेकदा नागरिक तक्रार करण्याचे सोडून देतात. त्यामुळे त्याचा आकडा देखील मोठा आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पथकाने आंध्र प्रदेश प्रदेशातील 4 महिलांना मोबाईल चोरताना पकडले आहे. आगुराम्मा गिड्डीआण्णा गुंजा (वय 35), आमुल्ला आप्पुतोलाप्रभाकर कंप्परिलाथिप्पा (वय 37), अनिता पिटला सुधाकर (वय 21), सुशीला इसाम तंपीचेट्टी (वय 35, सर्व रा. आंध्र प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

तसेच एका तरुणाच्या पँटच्या खिशातून 2 हजार रुपयांची रक्कम चोरत असताना संदीप सुनील बोरसे (वय 27, रा. धुळे) या चोरट्याला पोलिसांनी पकडले. गणेशोत्सवानिमित्त वेगवेगळ्या शहरातील चोरटे हात साफ करून घेण्यासाठी पुण्यात येत असतात. दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर बहुतांश भाविक बाबू गेनू व तेथून मंडईच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जातात. तुळशीबागेसमोरील रस्ता अरुंद असल्याने या ठिकाणी मोठी गर्दी होते. त्याचाच फायदा घेऊन चोरटे लोकांचे मोबाईल, पर्समधील वस्तू चोरून नेत आहेत.

साधारण 50 ते 60 मोबाईल येथून दररोज चोरीला जात असल्याचे समजते. मात्र, पोलिस वेबसाईटवर लॉस्ट अँड फाउंडवर तक्रार करायला सांगत असल्याने किती जणांचे मोबाईल चोरीला जातात, याचा नेमका आकडा समोर येत नसला तरी किमान 50 मोबाईल चोरीला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच सिंहगड रोड पोलिसांनी कर्नाटकातील टोळीकडून चोरीचे 84 मोबाईल जप्त केले होते.

अशा अडकल्या जाळ्यात…
खराडी येथे राहणार्‍या महिला दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या. या वेळी मंडपात मोठी गर्दी झाली होती. चोरट्यांनी फिर्यादी यांच्या पर्सची चैन उघडून त्यातील 40 हजार रुपयांचा मोबाईल चोरून नेला होता. त्याअगोदर काही महिलांचे मोबाईल चोरीला गेले होते. त्यामुळे पोलिस महिलांवर नजर ठेवून होते. तसेच सीसीटीव्हीवरून नजर ठेवण्यात येत होती. त्या वेळी या महिला आढळून आल्या. अंगझडतीदरम्यान या महिलांकडे चार मोबाईल आढळून आले. त्यातील तीन मोबाईल हे मुंबईतील लालबाग गणपती मंडळाच्या परिसरातून चोरले होते. चौथा त्यांनी नुकताच एका महिलेचा चोरला आणि त्या पोलिसांच्या तावडीत सापडल्या.

Back to top button