पुणे : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे 33 ठेकेदारांना नोटीस; खोदाईसाठी ‘मेट्रो’ ला 35 लाखांचा दंड | पुढारी

पुणे : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे 33 ठेकेदारांना नोटीस; खोदाईसाठी ‘मेट्रो’ ला 35 लाखांचा दंड

पुणे : ‘रस्ता केल्यानंतर त्यांचे दायित्व (डिफेक्ट लायबिलिटी पिरियड) असलेल्या 138 रस्त्यांपैकी 75 पेक्षा अधिक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. याप्रकरणी महापालिकेने 33 ठेकेदारांना नोटीस बजावली आहे. या ठेकेदारांवर प्रत्येक खड्ड्यामागे 5 हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे,’ असे अधिकार्‍यांनी सांगितले. पावसामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या खड्डयांमुळे वाहतुकीची गती मंदावली आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांबद्दल तक्रारी वाढल्यानंतर सर्वच स्तरांतून टीका झाली. महापालिका प्रशासनाने दायित्व असलेल्या रस्त्यांचा अहवाल पथ विभागाकडून मागविला होता. तसेच दायित्व असलेल्या रस्त्यावर खड्डे असल्यास ते खड्डे संबंधित ठेकेदारांकडून दुरुस्त करून घेण्याचा व कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार पथ विभागाने दायित्व असलेल्या 138 रस्त्यांची यादी तयार करून वरिष्ठांना दिली आहे. त्यानंतर जवळपास या रस्त्यांवर 75 ठिकाणी खड्डे पडणे, रस्ता-चेंबर खचणे असे प्रकार घडल्याचे आढळले.

शहरात गेल्या वर्षभरात खासगी केबल कंपन्यांसह, महापालिकेच्या समान पाणी योजना आणि ड्रेनेजसाठी खोदाई करण्यात आली.
यानंतर रस्त्यांची दुरुस्ती निकृष्ट पद्धतीने झाल्याने रस्त्यांची चाळण झाली होती. सतत पावसामुळे रस्ते दुरुस्तीही करता येत नसल्याने महापालिका प्रशासनाच्या कारभारावर टीका झाली. यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने पथ विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनाही नोटीस बजाविल्याचा आणि खड्डेप्रकरणी 60 लाखांचा दंड आकारल्याचा दावा केला आहेत. यामध्ये पथ विभागाने 9 लाख, पाणीपुरवठा विभागाने खोदाईनंतर रस्ते योग्य पद्धतीने ठेकेदाराने दुरुस्त न केल्याने 14 लाख, तर ड्रेनेज विभागाने 40 हजारांचा दंड लावला आहे. विद्यापीठ रस्त्यावर पावसाळ्यात केलेल्या खोदाईसाठी महामेट्रोला तब्बल 35 लाखांचा दंड आकारला आहे.

Back to top button