पुणे : अशैक्षणिक कामांचे ओझे! सांगा, मुलांना शिकवायचे कधी? गुरूजींचा सवाल | पुढारी

पुणे : अशैक्षणिक कामांचे ओझे! सांगा, मुलांना शिकवायचे कधी? गुरूजींचा सवाल

पुणे : शिक्षण हक्क कायदा अर्थात ‘आरटीई’ नुसार जनगणना, निवडणुकीची कामे आणि आपत्कालीन व्यवस्थापनाची कामे वगळता इतर कोणतेही अशैक्षणिक काम शिक्षकांना देता येत नाही, परंतु शिकवण्याव्यतिरिक्त 140 हून अधिक कामे शिक्षकांना करावी लागत आहेत. त्यामुळे गुरुजी अशैक्षणिक कामांच्या ओझ्याखाली दबले असून यामुळे मुख्य शिकवण्याचे काम राहून जात आहे.
शिक्षकांचे मूळ काम विद्यार्थ्यांना शिकवणे आणि शिक्षणाचा दर्जा उंचावणे आहे.

परंतु शिक्षकांना हे काम सोडून अन्य कामे मोठ्या प्रमाणात करावी लागतात. काही दिवसांपूर्वी शिक्षकांना राज्य सरकारच्या ई-पीक पाहणी प्रकल्पासाठी शाळांत पालक सभेचे आयोजन करण्यास सांगितले होते. ई-पीक पाहणी करण्याबाबत शेतकर्‍यांत जनजागृती करावी, स्नेहसंमेलने आयोजित करून मार्गदर्शन करावे, असेही म्हटले होते. अशाच प्रकारच्या विविध अशैक्षणिक कामांना शिक्षकांना जुंपले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आम्ही नेमके शिकवायचे कधी असा प्रश्न काही शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

शिक्षकांना सांगण्यात येणारी अशैक्षणिक कामे थांबवावीत आणि शिक्षकांनीदेखील एकदा शाळेत आल्यानंतर मोबाईलपासून दूर राहून वर्गात विद्यार्थ्यांना शिकवावे. वर्गातून फक्त तीन वेळा बाहेर पडावे. एकदा जेवण्यासाठी आणि दोनदा स्वच्छतागृहात जाण्यासाठी मग शिक्षणाचा दर्जा कितीतरी पटीने उंचावल्याशिवाय राहणार नाही.

                         – एक मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, दौंड तालुका

शिकवण्याव्यतिरिक्त 140 हून अधिक कामे…
शाळा उघडणे, वर्गखोल्या स्वच्छ करणे, घंटी वाजवणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, वर्गखोल्यांची रंगरंगोटी सजावट करणे, डिजिटल वर्गखोल्या तयार करणे, निवडणुकांवेळी करायची कामे, शाळांची बांधकामे, वेगवेगळी सर्वेक्षणे,शालेय समित्या स्थापण करणे, विविध शालेय योजनांची अंमलबजावणी करणे, आरोग्य खात्याशी सबंधित योजनांची व विविध शिष्यवृत्ती योजनांची अंमलबजावणी, शालेय दस्ताऐवज अद्यावत ठेवणे, ऑनलाइन कामे अशी जवळपास 140 हून अधिक कामे करावी लागत आहेत.

Back to top button