पुणे : विकास सोसायट्या अडचणीत, बँकेची देणी वाढली; अनिष्ट तफावतीचे प्रमाण 40 टक्क्यांवर | पुढारी

पुणे : विकास सोसायट्या अडचणीत, बँकेची देणी वाढली; अनिष्ट तफावतीचे प्रमाण 40 टक्क्यांवर

किशोर बरकाले
पुणे : राज्यातील विकास सोसायट्यांचे आर्थिक वर्ष 2021-22 अखेरचे लेखापरीक्षण जवळपास पूर्ण झालेले आहे. त्यापैकी सुमारे चाळीस टक्के विकास सोसायट्या या अनिष्ट तफावतीमध्ये असून, त्यांची संख्या आठ हजारांच्या आसपास आहे. तर, अनिष्ट तफावतीची रक्कम तब्बल 4 हजार 300 कोटी रुपये असल्याची माहिती सहकार आयुक्तालयातून देण्यात आली.

विकास सोसायटीचे बँकेचे देय असणारे कर्ज हे सभासद शेतकर्‍यांंच्या येणे असलेल्या रकमेपेक्षा जास्त असणे म्हणजेच त्यास अनिष्ट तफावत (इनबॅलन्स फिगर) असे म्हणतात. त्रिस्तरीय पतरचनेत राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि शेवटी विकास सोसायट्यांद्वारे प्रत्यक्ष गावातील शेतकर्‍यांना पीक कर्जांचे वाटप वर्षानुवर्षे होत आलेले आहे. मात्र, सोसायट्या अनिष्ट तफावतीत जाण्यामागे झालेल्या पीक कर्जवाटपाचे मुद्दल व व्याजासह पूर्णपणे होत नसलेली कर्जवसुली हाच कळीचा मुद्दा ठरलेला आहे.

तसेच विकास सोसायट्यांच्या सर्व सभासदांकडून शंभर टक्के पीक कर्जाची वसुली न होण्यामुळे बँकांच्या कर्जाचा बोजा सोसायटीवर पडतो. दरवर्षी ही रक्कम वाढत जाण्यामुळे अशा सोसायट्या तोट्यात जाण्याचे प्रमाण वाढते. शिवाय दुष्काळ, अतिवृष्टीने नुकसान अशा नैसर्गिक स्थितीतही शेतकरी पीक कर्ज वेळेवर भरू न शकण्यामुळेही शेवटी विकास सोसायट्या अडचणीत येत असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

काळानुरूप ज्या विकास सोसायट्यांनी केवळ पीक कर्ज वाटप करीत राहिल्या, त्यांचा विकास खुंटलेला आहे. मात्र, ज्यांनी व्यवसायाभिमुखता अंगीकारली आणि सातत्य ठेवून काम केले त्या कायम नफ्यात राहून उत्तम काम करीत असल्याचेही नुकत्याच पूर्ण करण्यात आलेल्या ऑगस्टअखेरच्या ताज्या लेखापरीक्षण अहवालातून समोर आलेले आहे.

पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तयार करणे, बी-बियाणे, खते आदी निविष्ठांचा व्यवसाय करून शेतकर्‍यांना सेवा-सुविधा देणे, कृषी यांत्रिकीकरणातून सभासद शेतकर्‍यांना ट्रॅक्टरसह अन्य अवजारांचा नाममात्र दरात पुरवठा व सेवा, स्वतःच्या मंगल कार्यालयाच्या उभारणीतून मिळणारे भाडे उत्पन्न, पिठाच्या गिरण्या अशा सेवा-सुविधा देणार्‍या विकास सोसायट्यांची संख्याही आता वाढत आहे.

‘अ’ वर्गात असणार्‍या विकास सोसायट्यांची संख्या 1 हजार 901 इतकी आहे. या संस्था प्रामुख्याने नफ्यात आहेत. ‘ब’ वर्गातील संस्था नफ्यात असल्या, तरी निकषांमध्ये पूर्तता करण्यास त्या कोठे ना कोठे कमी पडतात, अशी स्थिती आहे. आर्थिक बाबींनुसार विकास सोसायटीला लेखापरीक्षण वर्ग दिला जातो.

त्यामध्ये शंभरपैकी 90 चे वर गुण असल्यास ‘अ’ वर्ग दिला जातो. 75 ते 89 गुण मिळाल्यासही ‘अ’ वर्ग दिला जातो. 50 ते 74 गुण मिळाल्यास ‘ब’ वर्ग मिळतो. 40 ते 49 गुण असतील तर ‘क’ वर्ग दिला जातो. तर 39 गुणांच्या आतील विकास सोसायट्यांना ‘ड’ वर्ग दिला जात असल्याचीही माहितीही अधिकार्‍यांनी दिली.

  • विकास सोसायट्यांची एकूण संख्या 20,868
  • लेखापरीक्षण पूर्ण झालेली संख्या 20,746
  • लेखापरीक्षण पूर्ण संस्थांचे शेकडा प्रमाण 99.42%
  • लेखापरीक्षण होणे बाकी असलेल्या संस्था 122
  • लेखापरीक्षण पूर्ण विकास संस्थांची वर्गवारी
  • ‘अ’ वर्गातील विकास संस्था 1901
  • ‘ब’ वर्गातील विकास संस्था 7911
  • ‘क’ वर्गातील विकास संस्था 9723
  • ‘ड’ वर्गातील विकास संस्था 1210
  • वर्ग नाही 1

 

Back to top button