कोळविहिरेकर करणार ‘रेल रोको’: आमदार संजय जगताप यांची माहिती | पुढारी

कोळविहिरेकर करणार ‘रेल रोको’: आमदार संजय जगताप यांची माहिती

जेजुरी; पुढारी वृत्तसेवा: रेल्वेच्या कामासाठी कोळविहिरे गावाकडे जाणारे दोन्ही रस्ते मागील सहा महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी उपोषण आंदोलन सुरू केले. मात्र, तरीही रेल्वे विभागाकडून दखल घेतली जात नसल्याने रविवारी (दि. 4) सकाळी भोरवाडी येथे उपोषणासह ‘रेल रोको’ आंदोलन करण्यात येणार असल्याचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.

आमदार संजय जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, विराज काकडे, राजेश चव्हाण यांनी शनिवारी (दि. 3) उपोषण आंदोलनाला भेट दिली. या ठिकाणी सोमनाथ खोमणेंसह परिसरातील ग्रामस्थ उपोषण आंदोलन करीत आहेत. आंदोलनाचा शनिवारी दुसरा दिवस होता. रेल्वे प्रशासन दखल घेत नसल्याने आमदार संजय जगताप यांनी रविवारपासून ग्रामस्थांसह रेल्वेरुळावरच आंदोलन सुरू करू, असा इशारा दिला.

त्यासाठी शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. अन्यथा, रविवारी (दि. 4) सकाळी 10 वाजता रुळावरच आंदोलन सुरू केले जाईल आणि परिसरातील आठ ते दहा गावांचे नागरिक आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. परिसरातील कर्नलवाडी, गुळुंचे, राख, नावळी, दौंडज, साकुर्डे, मावडी कडेपठार या परिसरातील ग्रामस्थांनी आंदोलनस्थळी भेट दिली.

Back to top button