मोशी : सिग्नल बंदने चालकांची डोकेदुखी | पुढारी

मोशी : सिग्नल बंदने चालकांची डोकेदुखी

मोशी : येथील जाधव वाडी चौकातील सिग्नल व्यवस्था बंद असल्याने त्याचा मोठा फटका वाहनचालकांना बसत आहे. तसेच, यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जाधव सरकार चौकातील सिग्नल व्यवस्थेची अवस्था बिकट झाली असून, पालिका मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे. हा चौक महत्त्वाचा असून पूर्वेला नाशिक महामार्गला जाता येते, तर पश्चिमेला टेल्को कंपनी आणि मुंबई महामार्गाला जाता येते. उत्तरेला सीएनजी पंप आणि भाजी मंडई आहे. यामुळे या चौकातून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते.

सिग्नल सुरू करण्याची मागणी
शिवाय जाधववाडी ग्रामस्थदेखील याच चौकाचा वापर अधिक करतात. असे असतानाही येथील सिग्नल गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिक, वाहनचालक यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. यामुळे तातडीने येथील सिग्नल सुरू करण्याची मागणी होत आहे.

पादचार्‍यांनाही त्रास
शिवाय येथील सर्व्हिस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने पार्क होत आहेत. त्यावरदेखील कारवाई केली जावी, अशी मागणी केली जात आहे. येथे मोठे वाहनेदेखील या ठिकाणी उभी असतात. त्याचाही त्रास पादचार्‍यांना होत असतो.

रस्ता बनला अपघाताचे आगार
या चौकातून केएसबी चौकाकडे जाण्यासाठी सर्व्हिस रस्त्याचा वापर करावा लागतो. मुख्य रस्त्याला थेट भुयारी मार्ग जोडला गेला आहे. सर्व्हिस रस्त्याला जात असताना समोरूनदेखील वाहने भरधाव येतात. शिवाय याच रस्त्यावर टेल्को कंपनीत आलेल्या कामगारांची वाहने मोठ्या प्रमाणात पार्क केलेली असतात. यामुळे हा रस्ता अपघाताचे आगार बनल्याचे
चित्र आहे.

Back to top button