कोथरूड : बैठ्या घरांवरही मोबाईलचे टॉवर; पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे जीव टांगणीला | पुढारी

कोथरूड : बैठ्या घरांवरही मोबाईलचे टॉवर; पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे जीव टांगणीला

कोथरूड; पुढारी वृत्तसेवा: वेगाने विकसित होत असलेल्या कोथरूडमधील अनेक घरांवर विविध कंपन्यांचे टॉवर्स मोठ्या संख्येने उभारले जात आहेत. मात्र हे चांगल्या मजबूत इमारतीवर उभारले आहेत का, याकडे पालिकेचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. परिणामी, एखादे टावर्स कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे.

कोथरूड परिसरात सुविधा देण्याच्या दृष्टीने प्रशासन, व्यापारी व खासगी कंपन्या प्रयत्न करत असतात. मोबाईल कंपनीकडून वस्ती भागात बैठी घरावर टॉवर उभे केले असल्याचे चित्र कोथरूड – वारजे भागात पाहावयास मिळत आहे. प्रामुख्याने कोथरूडमधील जय भवानीनगर, लक्ष्मीनगर व वारजे भागातील जुना जकात नाका, तपोधाम परिसर येथे बैठी घरावर हे टॉवर उभे आहेत.

संबंधित टॉवर कायदेशीर आहेत की नाही, याबाबत पालिकेला अनेकदा तोंडी व लेखी कळविले, ‘आम्ही पाहून घेतो‘ इतकेच उत्तर तोंडी देत विषय टाळला जातो. प्रशासनराज असल्याने आम्हाला कोणीही दाद देत नसल्याचे एका ज्येष्ठ नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर दै. ‘पुढारी’शी बोलताना माहिती दिली. एखाद्या वास्तूवर टॉवर उभा करताना वास्तूचा दर्जा तपासणे अधिक गरजेचे आहे. जेणेकरून टॉवरचा लोड त्या वास्तूला शेजारील परिसराला त्रासदायक ठरणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक असते, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

सामाजिक कार्यकर्ते निखिल कडू आणि रमेश उभे म्हणाले की, सार्वजनिक शौचलयाचा आधार घेत टॉवर उभा करत एका व्यक्तीने अनेक महिने भाडे देखील मिळवले; परंतु पालिकेला याची काही खबर नव्हती त्याची माहिती कळविल्यावर कारवाई केली. दरम्यान, याबाबत टॉवर विभागाचे अधिकारी यांना विचारले असता टॉवरची पाहणी करत पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

 

Back to top button