पुणे : महामार्गावरील सशस्त्र दरोड्याचा छडा ! गोळीबार करून साडेतीन कोटी लुटणारे दरोडेखोर जेरबंद | पुढारी

पुणे : महामार्गावरील सशस्त्र दरोड्याचा छडा ! गोळीबार करून साडेतीन कोटी लुटणारे दरोडेखोर जेरबंद

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सशस्त्र दरोड्याचा पर्दाफाश करण्यात पुणे ग्रामिण पोलिसांना यश आले आहे. अंगडीयाच्या गाडीवर गोळीबार करत 3 कोटी 60 लाख रुपयांची रोकड लुटणार्‍या दरोडेखोरांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा व इंदापुर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत कुर्डूवाडी व राजस्थान येथील उद्यपुर परिसरातून जेरबंद केले. अटक केलेल्या दोघा आरोपींकडून चोरी केलेली 1 कोटी 43 लाख 20 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. अशी माहिती पोलिस अधीक्षक डा’. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे आदी उपस्थित होते. सागर शिवाजी होनमाने (वय 34), बाळु उर्फ ज्योतीराम चंद्रकांत कदम (वय 32, राहणार दोघे कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर, रजत अबू मुलाणी (वय 24, रा. न्हावी, ता. इंदापुर) या कुर्डूवाडी परिसरात ताब्यात घेण्यात आले आहे.

तर त्यांचे फरार झालेले अन्य तिघे साथीदार गौतम अजित भोसले (वय.33,रा. वेने,ता. माढा), किरण सुभाष घाडगे (वय.26,रा. लोणीदेवकर,ता. इंदापूर), भुषण लक्ष्मण तोंडे (वय.25,रा.लोणीदेवकर,ता. इंदापूर) यांना राजस्थान उद्यपुर येथून राजस्थान पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले आहे. 26 ऑगस्ट रोजी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास इंदापुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वरकुटे पाटी पासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर घडली होती. याप्रकरणी अंगडीया भावेशकुमार अमृत पटेल (रा.कहोडा,जि. मेहेसाना, राजस्थान) यांनी इंदापुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

गोळीबार अन् दरोड्याचा थरार..

फिर्यादी पटेल हे अंगडीयाचे काम करतात,एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी रोकड वाहतूक करण्याचे त्यांचे काम असते. नेहमीप्रमाने ते नांदेड,लातुर व सोलापूर येथून रोकड असलेले पार्सल घेऊन मुंबईकडे चारचाकी गाडीतून निघाले होते. 26 ऑगस्ट रोजी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास इंदापूर टोलनाका पास केल्यानंतर वरकुटे पाटी जवळ सहा जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉड दाखवून अडविण्याचा प्रयत्न केला. तेथे गतीरोधक असल्यामुळे गाडीचा वेग कमी झाला होता.

मात्र पटेल यांनी गाडी थेट पुढे पळवली. दरम्यान दरोडेखोरांनी दुसर्‍या वाहनातून अंगडीयाच्या गाडीचा पाठलाग करून त्यांना सात ते आठ किलोमीटर अंतरावर गाडीला गाडी आडवी लावून गाठले. पटेल हे गाडीचा दरवाजा खोलत नाही हे पाहून दरोडेखोरांनी त्यांच्याकडील पिस्तूलातून दोन गोळ्या गाडीच्या दरवाज्यावर झाडल्या. दरवाजा उघडून पटेल यांचे सहकारी विजयभाई सोलंकी यांना मारहाण करून दोघांना दुसर्‍या गाडीत बसवले.

त्यानंतर पटेल यांच्या गाडीत रोकड तसेच व इतर ऐवज असा तीन कोटी साठ लाख रुपयांची रोकड चोरी केली. पुढे स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पटेल व सोलंकी या दोघांना सोडून दिले. हा प्रकार घडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. गुन्ह्याचे गांभिर्य पाहता पोलिसांनी तत्काळ तपासाला गती देत सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषनाद्वारे सागर, बाळू आणि रजत या तिघांना सुरूवातीला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवतात त्यांनी गुन्ह्यांची कबुली देत इतर तिघा साथीदारांची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके, इंदापुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे, उपनिरीक्षक अमित सिदपाटील, गणेश जगदाळे कर्मचारी रविराज कोकरे, तुषार पंदारे, बाळासाहेब करांडे,स्वप्निल अहिवळे, अक्षय नवले, अजय घुले, विजय कांचन, कल्याण खांडेकर, सुरेंद्र वाघ, सुरज गुंजाळ, प्रताप सिंग यांच्या पथकाने केली.

सकाळी साडे अकरा वाजता पोलिसात धाव

रात्री अडीच वाजताच्या सुमारास दरोडेखोरांनी अंगडीयाकडील रोकड लुटली होती. मात्र त्यावेळी त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली नाही. सकाळी साडे अकरावाजताच्या सुमारास पोलिसांना हा प्रकार कळाला. पटेल याने हा प्रकार घडल्यानंतर याची माहिती त्याच्या मुंबईल येथील मुख्यमालकाला दिली होती. त्यानंतर ते इंदापूर येथे आल्यानंतर पटेल याने पोलिसांना झालेला प्रकार कळवला असे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.

असा झाला एकमेकांसोबत परिचय

अटक करण्यात आलेले आरोपी आणि राजस्थान येथून ताब्यात घेण्यात आलेले संशयीत आरोपी हे एकमेकांचे मित्र आहेत. सर्वजण एकमेकांच्या परिचयातील आहेत. दरवर्षी ते उज्जेन येथे देव दर्शनासाठी जात असल्याचे व त्यातून ते एकत्र आले असल्याचे तपासात समोर आले आहे. संशयीत आरोपींपैकी तिघांनी गुन्हा केल्यानंतर त्यांनी राजस्थान येथे जाणे पसंत केले. त्यांनी राजस्थान येथे जाताना तेथील माउंट आबु, अजमेर येथे जात असल्याचे घरी सांगितल्याचे तपासात समोर आले आहे.

सागरचा माग अन् दरोड्याचा छडा                                                                                                                              घटनेच्या दिवशी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास दरोडा टाकल्यानंतर तपासाची स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके तर इंदापूर पोलिस ठाण्याची तीन पथके अशी सहा पथके दरोड्यानंतर कामाला लागली. पथकांद्वारे तांत्रिक विश्लेषण केले गेले. त्या आधारे दरोड्या ठिकाणचे, आजुबाजुचे तसेच टोल नाक्यावरील सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात आले. प्रथमतः गुन्ह्यात महत्वाची भूमिका बजावणारा सागर होनमाने ह्याचा ठाव ठिकाणा लागला. जेव्हा पोलिस सागरच्या घरी पोहचले तेव्हा सागरहा घराजवळ निवांत बाकड्यावर बसला होता. त्याने त्याच्या वाट्याची रक्कम घराजवळ असलेल्या विटभट्टी असलेल्या खोलीत ठेवली होती.

त्याच्याकडून तब्बल 72 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. त्यानंतर बाळु कदम आणि रजत मुलानी यांनी नावे गुन्ह्यात निष्पन्न झाली. मुलानीच्या घरातून ही 71 लाख 20 हजार रूपये जप्त करण्यात आले. सागर होनमाने हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी गांजा तस्करीचा गुन्हा दाखल आहे. ज्या पध्दतीने गुन्हा घडला त्या आधारे गुन्ह्याची रेकी झाल्याची शक्यता आता वर्तवीण्यात येत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे जेव्हा हा प्रकार घडत होता, तेव्हा पटेल याने आपल्या मुंबईच्या प्रमुखाला याची माहिती दिली होती. त्यावेळी आरोपींचा आवाज मोबाईल रेकॉर्डींगमध्ये झाला होता. पोलिसांनी स्थानिक परिसरातील माहितीनुसार अंदाज बाधून सागरचा माग काढला.

अंगडीयांच्या गोटातूनच खबर फुटल्याची शक्यता                                                                                                      अंगडीयांचे आर्थिक व्यवहार हे अत्यंत गोपनीय पध्दतीने चालत असतात. त्यांच्याकडून आर्थिक व्यवहार करताना ती माहिती ते कधीही बाहेर फुटु देत नाही. मात्र यामध्ये अंगडीया संबंधीत मार्गाने जाणार असल्याची खबर आरोपींना मिळाल्यामुळेच त्यांनी हा दरोड्याचा प्लॅन आखला असल्याचे यावेळी अधीक्षकांनी सांगितले. त्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत.

ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांच्या चौकशीत कट उघड होण्याची शक्यता 
अटक व ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीत आरोपींचे राहणीमान अत्यंत साध्यापध्दीचे असून ते त्या पैशाचे काय करणार होते. याबाबत त्यांच्याकडून अद्याप माहिती देण्यात आली नाही. ते त्या रकमेचे नेमके काय करणार होते याबाबतही त्यांच्याकडून काहीही माहिती मिळाली नाही. याप्रकरणात राजस्थान येथून ताब्यात घेण्यात आलेल्या तीन संशयीतांकडून नेमका कट का ? कोणाच्या सांगण्यावरून आणि कोठे रचला गेला ? कटात किती लोकांचा सहभाग आहे. हे ताब्यात घेण्यात आलेल्या तीन जणांच्या चौकशीतूनच स्पष्ठ होईल

प्रत्येकाच वाटा 72 लाखांचा
गुन्ह्यात तिघांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून 1 कोटी 43 लाख 20 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. त्यांच्या वाट्याची रक्कमही ठरली होती. प्रत्येकाच्या वाट्याला 72 लाख अशा प्रमाणे दोघांकडून ही रक्कम जप्त करण्यात आली. आता ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी किती जणांना किती वाटा मिळाला की, त्यांच्या हिश्याची रक्कम या दोघांपेक्षा अधिक होती हे तपासामध्ये समोर येईल.

प्राथमिक तपासात गौतम म्होरक्या
ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तपासात राजस्थान येथून ताब्यात घेण्यात आलेला गौतमच हा गुन्ह्याच म्होरक्या असल्याचे प्राथमिक तपासात होमाने, मुलाणी आणि कदम यांच्या सांगण्यावरून समोर आले आहे. त्या आधारे आता पोलिस त्या बाजुनेही तपासाला लागले असून गौतमने हा गुन्हा करताना नेमकी कोणती भूमिका बजावली याचाही तपास केला जात आहे. त्यांना पुण्यात आणल्यानंतर त्यांना या गुन्ह्यात अटक दाखविण्यात येणार आहे.

Back to top button