पुणे : तीन महिन्यांत 30 राज्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस | पुढारी

पुणे : तीन महिन्यांत 30 राज्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस

शिवाजी शिंदे

पुणे : यंदाच्या पावसाळ्यात देशात पावसाने उशिरा सुरुवात केली असली तरी, गेल्या तीन महिन्यांत 36 पैकी 30 राज्यांत सरासरी किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला असल्याचे दिसून आले आहे. देशात सर्वाधिक पाऊस तामिळनाडू, तर सहा राज्ये अजूनही दुष्काळाच्या छायेत आहेत. पावसाळा संपण्यास एक महिना उरला आहे. त्यानुसार परतीच्या पावसाने हजेरी लावल्यास दुष्काळाच्या छायेत असलेल्या राज्यातील पाऊस सरासरीच्या आसपास पोहचण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे संपूर्ण देशात तीन महिन्यांची पावसाची सरासरी 700.7 मिमी आहे. याउलट आतापर्यंत 743.8 मिमी म्हणजेच सरासरीपेक्षा 6 टक्के अधिक पाऊस पडला आहे. हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनमध्ये देशात 96 ते 103 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार जून महिना पूर्णपणे कोरडा गेला. पावसाने कोणत्याही राज्यात हवा तसा पाऊस पडला नाही. त्यामुळे चिंतेचे वातावरण तयार झाले होते. मात्र, जुलै महिना सुरू होताच देशातील सर्वच भागात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली.

अर्थात, जुलै महिन्याच्या मध्यंतरानंतर पावसाने जोर धरला, तर ऑगस्ट महिन्याच्या पूर्वार्धापर्यंत पावसाने मुक्तहस्ते उधळण केली. त्यामुळे देशाच्या बहुतांश राज्यातील धरणे भरली. त्याचा परिणाम पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी मुबलक झाला असल्याचे दिसून आले. देशातील ईशान्य भारत, उत्तर पश्चिम भारतातील राज्यांमध्ये अजूनही सरासरीपेक्षा पाऊस कमी पडलेला आहे.

मात्र, पावसाळ्याच्या अखेरच्या काळातील सप्टेंबर हा महिना शिल्लक राहिला आहे. विशेषत: याच महिन्यात राज्यस्थानच्या पश्चिम भागाकडून पावसाचा परतीचा प्रवास सुरू होतो. या कालावधीत देशातील बहुतांश राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार या प्रमाणात पाऊस हजेरी लावीत असतो. त्यामुळे ज्या राज्यात कमी पाऊस पडला आहे. तसेच जी सहा राज्ये दुष्काळाच्या छायेत आहेत, त्या राज्यांची पावसाची सरासरी भरून निघण्याची शक्यता आहे.

देशात सर्वाधिक तामिळनाडू राज्यात
सहा राज्यांत अजुनही सरासरीपेक्षा कमी पाऊस
बहुतांश राज्यातील धरणे भरली
देशात तीन महिन्यांत पडला 743.8 मिमी पाऊस
पावसाळा संपण्यासाठी उरला केवळ एक महिना

Back to top button