पुणे : भुयारी मेट्रोचे रूळ टाकण्यास प्रारंभ; विद्युत तारा आणि सिग्नल यंत्रणाही | पुढारी

पुणे : भुयारी मेट्रोचे रूळ टाकण्यास प्रारंभ; विद्युत तारा आणि सिग्नल यंत्रणाही

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मेट्रोसाठीच्या भुयारी मार्गात मेट्रोचे रूळ टाकण्याचे, विदयुत तारा आणि सिग्नल यंत्रणा बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शिवाजीनगरपासून स्वारगेटपर्यंत पाच भुयारी स्थानके आहेत. मेट्रो ट्रॅक झाल्यानंतर त्यावरून मेट्रो धावू लागेल. पिंपरी-चिंचवड महापालिका भवनापासून रेंजहिल्सपर्यंत मेट्रो उन्नत मार्गाने धावणार आहे. रेंजहिल्सपासून मेट्रो सहा किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गाने स्वारगेटपर्यंत जाईल. त्यामध्ये शिवाजीनगर, न्यायालय, बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट ही पाच भूमिगत स्थानके आहेत.

टनेल बोरिंग मशिनच्या साह्याने भूमिगत मार्गाचे काम चार जूनला पूर्ण झाले. अन्य कामे केल्यानंतर गुरुवारपासून (ता. 25 ऑगस्ट) मेट्रोचा ट्रॅक व अन्य कामे सुरू करण्यात आली. ट्रॅक टाकण्यासाठी वर्तुळाकार बोगद्याच्या खालील बाजूला काँक्रीटीकरण करून सपाटीकरण केले जाते. दोन ट्रॅकमधील रुंदीनुसार काँक्रीटची ट्रॅक प्लिंथ बनवून त्यावर ट्रॅकच्या फिटिंगसाठीचे फिक्सिंग कंपोनंट लावण्यात येतील.

ही कामे झाल्यानंतर ट्रॅक बसवण्याचे काम पूर्ण होते. न्यायालय व रेंजहिल्स या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी काम सुरू केले आहे. बोगद्याचे भाग कास्ट करताना विद्युत तारा लावण्यासाठीचे फिक्चर बसविले आहेत. भूमिगत मार्गात सिग्नल यंत्रणा उभारण्यात येत आहे.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले, ‘भूमिगत मार्गातील ट्रॅक, विद्युत तारा व सिग्नल यंत्रणांची कामे काही महिन्यांत पूर्ण होतील. त्यानंतर भूमिगत मार्गात मेट्रोची चाचणी घेणे शक्य होईल.’

Back to top button