भोर : राज्यात आरोग्यमंत्री कोण? : खासदार सुप्रिया सुळे | पुढारी

भोर : राज्यात आरोग्यमंत्री कोण? : खासदार सुप्रिया सुळे

भोर; पुढारी वृत्तसेवा: शिंदे-फडणवीस सरकारात कोणाचे लग्न लागले, तर कोणाचा बस्ता बांधला आणि कोण हनिमूनला गेले असल्याने राज्याचा आरोग्यमंत्री कोण आहे? याची आम्हाला माहिती नाही. परंतु, तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे काम राज्यात ‘डायरेक्शन’ पद्धतीने असल्यामुळे देश त्यांची ‘लाइन’ घेत असे, परंतु, आताचे सरकार एकपात्री कार्यक्रम राबवीत आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केली. भोर येथे आयोजित पत्रकार परिषदेत खासदार सुळे बोलत होत्या.

या वेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे, तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य विक्रम खुटवड, शहराध्यक्ष नितीन धारणे, जिल्हा महिलाध्यक्षा भारती शेवाळे, तालुकाध्यक्षा विद्या यादव, माजी जि. प. सदस्या वंदना धुमाळ, चंद्रकांत बाठे, शहराध्यक्षा हसीना शेख, भालचंद्र जगताप, मानसिंग धुमाळ उपस्थित होते.

खा. सुळे म्हणाल्या की, लोकशाही असल्याने बारामती मतदारसंघात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या जरी माझ्याविरोधात निवडणूक लढण्यास तयार असल्या, तरी मी त्यांचे स्वागत करते. महाराष्ट्र हा यशवंतराव चव्हाण यांचा असल्यामुळे या ठिकाणी सत्तेत विकेंद्रीकरण झाले पाहिजे. परंतु, भाजप सरकार हे ‘एक पक्ष एक देश’ अशी वल्गना करून महागाईत सामान्य जनतेची फसवणूक करीत आहे.

शिंदे-फडणवीस नवीन सरकार स्थापन होऊन दोन महिने झाले, तरी पुणे जिल्ह्याला पालकमंत्री मिळाला नाही. या ‘ईडी’ सरकारने लवकरच पुणे जिल्ह्याला पालकमंत्र्यांची नेमणूक करावी. पालकमंत्री नसल्याने जनतेची सर्व कामे ठप्प झाली आहेत. सध्याच्या नवीन निष्क्रिय सरकारला सत्ता दादागिरीसाठी हवी होती, सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी नाही, अशी टीकाही खा. सुळे यांनी केली. या ‘ईडी’ सरकारच्या मंत्र्यांना विकासकामे, शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत वेळ नसल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचे नुकसान केले आहे.

 

Back to top button