चिखली रस्त्याला लागले अवैध वाहनतळाचे ग्रहण | पुढारी

चिखली रस्त्याला लागले अवैध वाहनतळाचे ग्रहण

मोशी : मोशी, चिखली आणि प्राधिकरण भागात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर विकास झाला असून, या भागात रहदारी वर्गाचे प्रमाण वाढत आहे. मात्र मोशी, चिखली, स्पाईन रस्त्याला बेकायदा वाहनतळाचे ग्रहण लागले असल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. अंतर्गत भागात प्रवेश करण्यासाठी असलेल्या रस्त्याच्या बाजूला बेशिस्तपणे वाहने उभी केली जात आहेत. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असून वाहनतळाचे धोरण ठरवण्यास दिरंगाई होत आहे. मोशी प्राधिकरणामध्ये दळण-वळणासाठी स्पाईन रस्ता बांधण्यात आला आहे. शहरातील सर्वांत प्रशस्त आणि चकाचक रस्ता म्हणून स्पाईन रस्त्याकडे पाहिले जाते.

या रस्त्याने दररोजच मोठ्या संख्येने वाहतूक होत असते. मॉलमध्ये येणारी वाहने सेवा रस्त्यावर उभी असतात. स्पाईन रस्ता विकसित करताना वाहनतळाबाबतचा विचार झालेला नाही. तर, काही खासगी व्यापारी संकुलांनी विकसित केलेल्या वाहनतळांचा वापर होत नसल्याने ही वाहनतळे ओस पडली आहेत. त्यामुळे स्पाईन सेवा रस्ते वाहन चालकांनी गिळंकृत केल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. स्थानिक नागरिकांना या वाहतुकीचा त्रास होऊ नये म्हणून या रस्त्यालगत सेवारस्ताही तयार करण्यात आला आहे.

मात्र, या सेवा रस्त्यांवर बेकायदेशीरपणे वाहने उभी केली जात आहे. भोसरी औद्योगिक परिसरात जाणारी मालवाहतूक वाहने गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर उभी केली जात आहेत. या वाहनांचे चालक-वाहक सकाळी या रस्त्यालगतच तोंड धुणे, अंघोळ करणे, रात्रीच्या वेळी रस्त्यावरच उशिरापर्यंत गप्पा मारत बसणे अशा कारणांमुळे या ठिकाणाहून ये-जा करणार्‍या महिलांना त्याचा त्रास होत आहे. स्पाईन रस्त्यालगत काही व्यापारी संकुलांनी नो-पार्किंग झोन केले आहेत. मात्र, पार्किंग झोन उपलब्ध करुन न दिल्याने रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी केली जात आहे.

रस्त्यावर लावण्यात येणार्‍या या पार्किंगच्या प्रश्नाची दखल अजूनही संबंधित प्रशासनाने घेतलेली नाही. याबाबत नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. चिखली पोलिस ठाण्यासमोरदेखील हेच चित्र असून चौकी समोरच्या सेवा रस्त्यावर तर बेधडक वाहने पार्क केली जात आहेत. टेल्को गेट समोरदेखील अवजड वाहने मार्ग केली जात असल्याचे दिसून येत आहे.

Back to top button