जांब येथे किरकोळ कारणावरून महिलेचा खून | पुढारी

जांब येथे किरकोळ कारणावरून महिलेचा खून

वालचंदनगर; पुढारी वृत्तसेवा: जांब (ता. इंदापूर) येथे किरकोळ भांडणात नातलगाला शिवी दिल्याच्या कारणावरून एका युवकाने महिलेच्या डोक्यात लाकडी दांडकाने मारहाण करत तिचा खून केला. याबाबत रात्री उशिरापर्यंत वालचंदनगर पोलिसात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. या घटनेत 45 वर्ष वयाची महिला वाघमारे (पूर्ण नाव माहीत नाही, मूळ रा. वडजल, ता. माण, जि. सातारा) यांचा खून झाला आहे. जांब गावाच्या शेजारी असलेल्या उसाच्या शेताजवळ मंगळवारी (दि. 23) रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला.

वाघमारे या जांब येथे आपल्या मुलीच्या घरी राहत होत्या. मंगळवारी किरकोळ कारणावरून गावातील काही नागरिकांशी त्यांचे भांडण झाले. त्या वेळी वाघमारे यांनी एकास शिवीगाळ केली. दरम्यान, आपल्या नातलगास शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून एका 21 वर्षीय युवकाने (नाव व पत्ता माहीत नाही) वाघमारे यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Back to top button