‘वारजे महामार्ग, सेवा रस्त्यावरील खड्डे बुजवा’ : वारजे हायवे विकास प्रतिष्ठान | पुढारी

‘वारजे महामार्ग, सेवा रस्त्यावरील खड्डे बुजवा’ : वारजे हायवे विकास प्रतिष्ठान

वारजे : पुढारी वृत्तसेवा : वारजे महामार्गावरील डुक्कर खिंड ते स्व. रमेश वांजळे हायवे चौकापर्यंत महामार्गासह सेवा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्यामुळे खड्डयाचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहने आदळून अपघातग्रस्त होत आहेत. त्यामुळे दुचाकीचालकांसह चारचाकीचालकांना अक्षरश: जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

येथील खड्डे बुजवून महामार्ग प्रशासनाने रस्ता त्वरित पूर्ववत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा वारजे हायवे विकास प्रतिष्ठानकडून देण्यात आला. महामार्ग प्राधिकरणकडे याबाबतचे निवेदन माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, माजी नगरसेवक प्रदीप धुमाळ, निवृत्ती येनपुरे, महादेव गायकवाड, सुरेश जाधव, अरुण पाटील आदींनी दिले. महामार्ग प्राधिकरणकडून या निवेदनाची दखल घेत महामार्ग व सेवा रस्त्यावरील सर्व समस्यांची पाहणी करण्यात आली असून, महामार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्यात येणार आहेत, अशी माहिती महामार्गाचे भरत तोडकरी यांनी दिली.

Back to top button