पुणे : कळस परिसरात बिबट्याचा वावर | पुढारी

पुणे : कळस परिसरात बिबट्याचा वावर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कळस येथील लष्कर परिसरामध्ये पहाटे साडेचारच्या सुमारास बिबट्याचा वावर दिसून आल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

विश्रांतवाडी-आळंदी मार्गावर लष्कर विभागाचा आरएनडीई (संशोधक विभाग) असून यालगतच लष्कराच्या जवानांसाठी सरावाचा व सोसायटीचा भाग आहे. त्यालगतच संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. हा नदीकाठचा भाग असून येथे मोठ्या प्रमाणात जंगलाचा भाग आहे. त्यामुळे परिसरात नेहमीच छोटे-मोठे वन्यप्राणी दिसत असतात. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास लष्कराचे जवान या भागात पहारा देत असताना पथदिव्याच्या उजेडात बिबट्याचा वावर स्पष्टपणे दिसून आला. जवळपास दहा ते पंधरा मिनिटे बिबट्या फिरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये निदर्शनास आले. याची व्हिडीओ क्लिप वायरल झाल्यामुळे परिसरातील लहान मुलांसह महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भागात लष्कराचे जवान सराव करत असतात आणि त्या भागातच बिबट्या दिसून आला असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे.

बिबट्या पाहून लष्कराच्या जवानांनी करून हाकलण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो जंगलाच्या दिशेने गेला. लष्कराच्या संरक्षक भिंतीमुळे त्याला लोकवस्तीत येता आले नाही. एखादी दुर्घटना घडण्याअगोदर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली. यासंदर्भात वनखात्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिसराची पाहणी करून शोध घेतला असता बिबट्या या परिसरात दिसून आला नाही. वन अधिकाऱ्यांची रात्री उशिरापर्यंत गस्त सुरु होती.

हेही वाचा

Back to top button