पुणे : राजगुरुनगर स्थानकात खड्डेच खड्डे | पुढारी

पुणे : राजगुरुनगर स्थानकात खड्डेच खड्डे

भामा आसखेड, पुढारी वृत्तसेवा : राजगुरुनगर बसस्थानक इमारतीला लाखोंचा मुलामा देऊन चकचकीत करण्यात आले असले तरी एसटी बस थांबत असलेल्या ग्राउंडवर मात्र सर्वत्र खड्डेच खड्डे असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. त्या पाण्याला दुर्गंधी सुटल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत.

राजगुरुनगर बसस्थानकाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. बसस्थानक इमारतीला दर्शनी बाजूनी लाखो रुपये खर्च करून मुलामा देण्यात आल्याने इमारत चकचकीत दिसत आहे. परंतु, बस थांबणारी जागा पाहिल्यावर प्रवासी उभे राहू शकत नाहीत, अशी स्थिती आहे. बस थांबणार्‍या ग्राउंडला जागोजागी खड्डेच खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले असून त्यातून बस सतत येत-जात असल्याने चिखलाची रबडी तयार झाली आहे, त्यातून दुर्गंधीयुक्त वास येत आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

चार दिवसांपूर्वी आगारातील ग्राउंडमध्ये असलेल्या सुलभ शौचालय टाकीच्या स्लॅबवर क्रशसॅन्डचा टेम्पो गेल्याने टाकीवरचा स्लॅब तुटला आहे, त्यामुळे टाकीतील मैला-पाण्याचा वास परिसरात सर्वत्र पसरला असून नागरिकांना राहणे मुश्किल झाले आहे. तसेच मैलाटाकीच्या जवळच वाहक, चालक यांना मुक्कामी राहण्यासाठी असलेला विश्रामगृहाचा परिसर अस्वच्छ बनला आहे. आगाराच्या आत पाण्याच्या टाकीची अवस्था तर खूपच दयनीय झाली आहे. बसस्थानक आगाराचे काँक्रिटीकरण किंवा डांबरीकरण करावे, अशी अपेक्षा प्रवाशींनी केली आहे.

Back to top button