नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : विजांच्या कडकडाटासह दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागाला आज मुसळधार पावसाने झोडपले. सकाळी दहा वाजता सुरू झालेला पाऊस दुपारपर्यंत कायम होता.
दिल्लीत मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने आणि सिग्नल यंत्रणा कोलमडून पडल्याने दिल्ली महानगरात ठिकठिकाणी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याचे चित्र होते.
दिल्लीला लागून नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम, फरिदाबाद ही मोठी शहरे आहेत. या शहरांना जोडणाऱ्या मार्गांवर मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. तर दिल्ली शहरातही नागरिकांना प्रवास करताना मोठ्या अडथळ्यांना तोंड द्यावे लागले.
सकाळीच पावसाला सुरुवात झाल्याने चाकरमान्यांना कार्यालय गाठणे मुश्किलीचे बनले होते. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीसह उत्तर भारतात ४ सप्टेंबरपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
ज्या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे, त्यात मध्य प्रदेश, राजस्थान उत्तर प्रदेशचा समावेश आहे. दिल्लीला लागून असलेल्या नोएडा, ग्रेटर नोएडा, दादरी, मेरठ, मोदीनगर आणि आसपासच्या परिसरातही आज पावसाने हजेरी लावली होती.
दरम्यान, खासगी हवामान अंदाज संस्था स्कायमेटने छत्तीसगडवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याचे सांगितले आहे. यामुळे पुढील दोन ते तीन दिवस पावसाचे ढग उत्तरेकडे सरकण्याचा अंदाज आहे. 3 सप्टेंबरनंतर मॉन्सूनचे वारे पुन्हा उत्तर भारताकडे वाहू लागतील.
हेही वाचलं का ?