सांगली ; शशिकांत शिंदे : राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची जिल्ह्यात जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, काँग्रेसबरोबरच शिवसेनेतील अनेकांची त्यांनी पक्षात मेगाभरती सुरू केली आहे.
शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनासुद्धा त्यांनी आवाहन केले आहे. खासदार संजय पाटील यांच्याशीसुद्धा त्यांची सलगी वाढते आहे.
पंधरा वर्षापूर्वी राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर असताना जिल्ह्यात तत्कालीन पालकमंत्री पतंगराव कदम, तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील आणि ना. पाटील यांच्यात जिल्ह्यातील नेतृत्वावरून सुप्त संघर्ष सुरू होता. त्यावेळीसुद्धा ना. पाटील यांनी अनेकांचा 'करेक्ट' कार्यक्रम केला.
त्यांच्या प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष भूमिकेमुळे त्यावेळीही करेक्ट कार्यक्रमाची जोरदार चर्चा असायची.
त्यातूनच त्यांचा गटाचा जेजीपी असा उल्लेख होत होता. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर अनेकजण भाजपमध्ये गेले.
जिल्ह्यात भाजपला बळकटी मिळाली. जिल्ह्यात भाजपचे चार आमदार आणि एक खासदार विजयी झाले.
मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा आता पक्षाची जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतील भाजपची सत्ता त्यांनी पदाधिकारी बदलाच्यावेळी काढून घेतली. त्याचा जोरदार धक्का भाजपला बसल्याने जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदल करण्याचे धाडस भाजपचे नेते करताना दिसत नाहीत.
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एकत्र सत्ता असली तरी जिल्ह्यावर ना. पाटील यांचाच वरचष्मा असल्याचे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे धमकावून त्यांना राष्ट्रवादीत घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची तक्रार शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे.
जिल्हा नियोजन समिती सदस्य निवडीतही राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिल्याने सेनेच्या नेत्यांनी तक्रारी केला. मात्र ना. पाटील यांना सरकारमध्ये महत्वाचे स्थान असल्याने त्यांचे कोणी फारसे ऐकून घेतले नाही.
गेल्या काही दिवसांपासून ना. पाटील यांनी पक्षबांधणी जोरदार सुरू केली आहे.
त्यामुळे भाजप, काँग्रेस आणि सेनेतील अनेक दुसर्या, तिसर्या फळीतील कार्यकर्ते राष्ट्रवादीत येत आहेत.
शिराळा तालुक्यात काँग्रेसला नेताच नसल्याने त्या पक्षातील अनेकजण राष्ट्रवादीत आले आहेत.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव कदम, नगरसेवक अजय जाधव यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
आष्टा येथे वैभव शिंदे पुन्हा राष्ट्रवादीत गेल्याने त्या ठिकाणी फारसा विरोधी गट उरलेला नाही.
खानापूर तालुक्यात माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना पक्षात वर्षांपूर्वीच घेतले आहे.
त्याशिवाय त्यांनी रविवारी आमदार बाबर यांनाही राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे.
"टेंभूच्या पाण्यासाठी अनिलभाऊ, करेक्ट कार्यक्रम करायची काही गरज नाही, मात्र करेक्ट कार्यक्रम याचसाठी की तुम्ही आमच्यात यावे म्हणून. थोडीतरी बाजूला फिल्डिंग लावली पाहिजे का नको? आमचा माणूस आमच्यातून बाजूला गेलेला आम्हाला दुःख नाही का?" अशा शब्दांत त्यांनी राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे.
सेनेचा जिल्ह्यात एकमेव असलेले आमदारही राहणार की नाही, याची चिंता सेनेच्या नेत्यांना वाटते आहे.
तेथील सुशांत देवकर यांना त्यांनी नुकतेच पक्षात घेतले आहे.
आटपाडीत भाजपमध्ये गेलेला देशमुख गट तटस्थ होत आहे. या तालुक्यातील भारत पाटील यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाची चर्चा आहे.
जत तालुक्यात बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे, बसवराज पाटील, मन्सूर खतीब यांचे राष्ट्रवादीमधील प्रवेश निश्चित झाले आहेत.
सांगली बाजार समितीचे सभापती पदाला मुदतवाढ मिळालेले दिनकर पाटील यांनी पूर्वीच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मिरजपूर्व भागातील मदन पाटील गटाचे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.
सांगलीत शिवसेनेतील शेखर माने, अजिंक्य पाटील, जिल्हा सुधार समितीचे अॅड. अमित शिंदेे राष्ट्रवादीत गेले आहेत. महापालिकेतील भाजपचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.
सांगली विधानसभा मतदारसंघ बळकट करण्याच्या दृष्टीने सांगलीवाडीतील हरिदास पाटील यांना स्वीकृतची संधी दिली आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आता भाजपमध्ये असलेले खासदार संजय पाटील यांचा भाजपमधील काही नेत्यांपासूनचा दुरावा वाढत आहे.
दुसर्या बाजूला ना. पाटील यांच्याबरोबर जाहीर कार्यक्रमातील त्यांची उपस्थिती वाढलेली आहे. त्याची लोकांत चर्चा सुरू आहे.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे.
सरकारमधील पक्षातील नेत्यांत सतत कुरघोडी सुरू असते. त्यातून सरकार पडल्यास मुदतपूर्व निवडणूक होऊ शकते.
त्यावेळी जिल्ह्यातून जास्तीत-जास्त आमदार निवडून आणण्यासाठी ना. पाटील यांची तयारी दिसून येत आहे.
त्याशिवाय आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बँक, सांगली बाजार समिती, नगरपालिका निवडणुकीत वर्चस्व ठेवण्यासाठीही विविध मार्गाने त्यांनी मेगाभरती सुरू केली आहे.