नगर जिल्ह्यात पावसाने हाहाकार, शेवगाव गेवराई राज्यमार्ग पाण्याखाली - पुढारी

नगर जिल्ह्यात पावसाने हाहाकार, शेवगाव गेवराई राज्यमार्ग पाण्याखाली

शेवगाव; पुढारी वृत्तसेवा : नगर जिल्ह्यातील पाथर्डी व शेवगाव या दोन तालुक्यांच्या भागात जोरदारपणे पावसाने हजेरी लावली. यामुळे नांदणी नदीला पूर आल्याने पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव, औरंगपूर व पागोरी पिंपळगाव तसेच शेवगाव तालुक्यातील आखेगाव, वरुर, ठाकूर पिंपळगाव या नदीकाठावरील गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. यामुळे नगर जिल्ह्यातील शेवगाव गेवराई राज्यमार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

अनेक घरे पाण्यात गेली आहेत, बचाव पथके नसल्याने अडचण होत आहे. पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

परंतु प्रभावी सुविधा नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. बचावकार्यासाठी नेवासा, पैठण येथून बोट मागविण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

तर आखेगाव येथे नदीला पाणी आल्याने शेकडो घरात पाणी शिरल्याने पाण्यात आहेत. वस्ती पूर्ण पाण्यात गेल्याने असंख्य कुटुंब अडकले आहेत रात्रभर घराच्या गच्चीवर भर पावसात थांबल्याचे नागरिकांनी सांगितले.

शेवगाव गेवराई राज्यमार्ग पाण्याखाली गेल्यानी वाहतूक ठप्प झाली. कित्येक तास वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांचा रांगा लागल्या आहेत.

ठाकूर पिंपळगाव येथे ट्रकवर अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यात यश आले आहे.

अनेक ठिकाणी जनावरे वाहून गेल्याच्या तक्रारी आहेत. वीज पुरवठा खंडित झाल्याने नेटवर्क व संपर्क करणे अडचणीचे ठरत आहे.

रात्री १० पासून पावसाने सुरवात केली सकाळपर्यंत कमी अधिक पाऊस सुरू आहे.

सर्वत्र पाणी पाणी झाल्याने नद्या नाले दुथडी वाहू लागले आहेत.

शेवगाव तालुक्याचा संपर्क तुटला

शेवगाव तालुक्यात काही गावाला पुराच्या पाण्याणे वेढा घातल्याने अनेक घरे पाण्यात आहेत. काही जनावरे, संसारपयोगी साहित्य, चारा, वाहने वाहून गेले असुन काही जनावरे मृत्युमुखी पडले आहेत. तालुक्यात ११० मि. मी.पाऊस झाला आहे.

सोमवारी रात्री तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने अनेक नद्यांच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून गावाला वेढा घातला आहे.

भगुर, वरुर, आखेगाव, ठाकूर निमगांव, वडुले आदी गावात पाणी शिरल्याने अनेकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

काटेवाडी येथील तिरमली समाजाचे घरगुती साहित्य वाहून गेले तर पुरात १०० व्यक्ती पाण्यात अडकल्या असून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

येथील पांडूरंग गोर्डे यांच्या ६ शेळ्या पाण्याने मरण पावल्या. तेथील काही जनावरेही वाहून गेली आहेत.

वरुर येथेही काही जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत. वरुर, भगूर गावात पाणी शिरल्याने नागरीक भयभीत झाली आहेत. त्यांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर केले असून वडुले येथील नंदिनी नदीने अक्राळ विक्राळ रूप धारण केल्याने नागरीक भयभीत झाले आहेत. काही व्यक्तींचा संपर्क तुटला आहे.

अनेकांच्या घरात पुराचे पाणी आले आहे. तर येथील एक व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मात्र अद्याप याची खात्रीशीर माहिती हाती आली नाही.

सोमवारी रात्री सुरु झालेला पाऊस पहाटेपर्यंत धुवांधार बरसत राहिला. या पावसाने खरीप पिकांचे आतोनात नुकसान झाले. नद्यांचे पाणी शेतात शिरल्याने पिके वाहून गेली.

आमदार मोनिका राजळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी जिल्हाधिकारी यांना नुकसानीची माहिती दिली.

तालुका प्रशासन सतर्क झाले असून परिस्थितीचा आढावा घेत खबरदारीचे उपाय केले जात आहे.

Back to top button