औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवाः जिल्ह्यात सलग दोन आठवड्यांपासून दडी मारून बसलेला पाऊस सोमवारपासून पुन्हा परतला आहे. मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून, आज पहाटेपर्यंत मुसळधार पाऊस बरसल्याने जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे कन्नड-चाळीसगाव मुख्य घाटमार्गावर दरड व झाडे उन्मळून पडल्याने हा मार्ग बंद झाला आहे. तालुक्यातील पाझर तलावही ओव्हरफ्लो झाला आहे. दरम्यान, रात्रीतून झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ७ मंडळातील खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात पुन्हा जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. सुमारे आठ तासांपासून सर्वच तालुक्यात पाऊस बरसत आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. तर काही मंडळांमध्ये मंगळवारी पहाटेपासून संततधार पावसास सुरुवात झाली आहे.
पावसामुळे चाळीसगाव हद्दीतील कन्नड-चाळीसगाव घाटात दरड कोसळल्याने हा रस्ता बंद झाला आहे. शिवाय या तालुक्यातील पाझर तलावासह आजुबाजूचे काही तलावही ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे गावात व शेतामध्ये पाणी साचले आहे.
जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू असून यात कन्नड मंडळात ११० मिमी., पिशोर १०४ मिमी., नाचनवेल ८३ मिमी., चिंचोली लिंबाजी ११२ मिमी. या मंडळात अतिवृष्टी झाली आहे. बिदरीतील पाझर तलाव ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील शेतात पाणी साचले आहे. मुसळधार झालेल्या पावसाने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हेही वाचलं का?