काँग्रेस नेते तहसीन पुनावाला यांच्यावर ‘पंजाब’ची विशेष जबाबदारी | पुढारी

काँग्रेस नेते तहसीन पुनावाला यांच्यावर 'पंजाब'ची विशेष जबाबदारी

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : मागील दोन दिवसांपासून  दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात नेत्यांची वर्दळ वाढली आहे. त्याचबरोबर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या पंजाबमधील पक्षांतर्गत मतभेद मिटण्यासाठी पहिल्यांदाच सक्रिय झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, हे काम मूळचे पुणेकर असलेले काँग्रेस नेते तहसीन पुनावाला यांच्यावर सोपविण्‍यात आले आहे.

काँग्रेस नेते तहसीन पुनावाला यांची गांधी घराण्याशी असलेली जवळीक सर्वश्रुत आहे. प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वडेरा यांच्या भगिनी मोनिका या पूनावाला यांच्या पत्नी आहेत.अलीकडच्या राजकीय घटनांवरून पूनावाला यांचा पडद्यामागील वावर वाढल्याचे दिसते.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील मतभेद मिटवण्यासाठी प्रियांका गांधी यांनी पुढाकार घेतला. त्याप्रमाणे काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांच्यासोबतच दोघांनी प्रियांका गांधी यांचीही भेट घेतली.

प्रियांका यांच्या शिष्टाईला बऱ्यापैकी यश आल्याचे दिसते. या मोहिमेत प्रियांका यांना दोन्ही बाजूंची सर्व माहिती पुरवण्याची जबाबदारी पूनावाला यांच्यावर होती. त्यामुळे ते पडद्यामागे सक्रिय होते.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि ज्येष्ठ नेते टी. एस. सिंगदेव यांच्यातील वादातही प्रियांका यांनी शिष्टाई केली.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले यांनी प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांना भेटण्यासाठी शनिवारी दिल्ली गाठली. त्याआधी पूनावाला यांनी त्यांची भेट घेऊन पक्षांतर्गत घडामोडीची माहिती घेतली. यानंतर यासंदर्भात प्रियांका गांधी यांच्‍याशी चर्चा केल्‍याचे समजते.

राज्यात काँग्रेसची स्वबळाची भूमिका खूप महत्वाची असल्याचे नाना पटोले पक्षश्रेठींना पटवून देणार आहेत, असेही समजते.

हेही वाचलं का ?

Back to top button