अफगाणिस्तान मधील हल्ल्यांची मीमांसा

अफगाणिस्तान मधील हल्ल्यांची मीमांसा
Published on
Updated on

अफगाणिस्तान येथील नागरहार येथे अमेरिकेने बॉम्बहल्ला केला. मात्र, तरीही काबूलवरील रॉकेट हल्ले थांबलेले नाहीत. या हल्ल्यांतून अमेरिकन सैन्याला 31 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानातून चालते व्हा, असा इशारा देण्यात येत आहे. कारण, तालिबानला आणि त्यांचा कर्ताकरविता असणार्‍या पाकिस्तानसह चीनला अफगाणिस्तानात वर्चस्व निर्माण करायचे आहे. त्यासाठी अमेरिकन सैन्याचा अडसर नको आहे.

काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर 26 ऑगस्ट रोजी अत्यंत भीषण आत्मघातकी दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये 170 हून अधिक जणांचा बळी गेला; तर शेकडो जखमी झाले. त्यापाठोपाठ सोमवारी सकाळी काबूल विमानतळानजीक पुन्हा रॉकेट हल्ले झाले. अद्यापही या हल्ल्यांची मालिका सुरूच आहे. काबूल विमानतळावरील हल्ल्याची जबाबदारी आयसिस खोरासन नावाच्या संघटनेने घेतली. इस्लामिक स्टेट या कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेची ही अफगाणिस्तानातील शाखा. 2014 मध्ये तिची स्थापना झाली होती. अफगाणिस्तानात अत्यंत कडवे जिहादी शासन आणण्याचा त्यांचा मनोदय आहे. अमेरिकेशी त्यांचे असलेले वैमनस्य खूप जुने आहे.

आयसिस खोरातनचे केंद्र अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या सीमेवरील नांगरहार येथे आहे. 2017 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत शक्‍तिशाली बॉम्ब नांगरहारवर डागला होता. आयसिस खोरासनचे या भागात सात ते आठ हजार कार्यकर्ते पूर्वी तेथे असायचे; पण आता आयसिसचे कार्यकर्ते हे शहरी भागांकडे वळले असून, तेथून ते 'स्लीपर सेल' म्हणून कार्यरत असतात. काबूल विमानतळावर आयसिस खोरासनने केलेला ताजा हल्ला हा 2017 च्या हल्ल्याचा बदला म्हणून केला. या विमानतळावरून मुख्यत्वे करून अमेरिकेच्या सैन्याला अफगाणिस्तानातून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. ही वेळ साधून आयसिस खोरासनने आत्मघाती हल्ला केला.

या हल्ल्यानंतर तत्काळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी नांगरहारमध्ये ड्रोनच्या साहाय्याने हल्ला केला. तसेच, काबूल हल्ल्याची योजना आखणार्‍या मास्टरमाईंडला या हल्ल्यामध्ये ठार केल्याचा दावा केला; पण त्याचे नाव काय याविषयी कसलीही माहिती अमेरिकेने जाहीर केलेली नाही. त्यामुळे अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात नेमके कोण ठार झाले याविषयीची माहिती गुलदस्त्यातच आहे.

यानंतर नागरी वस्तीमध्ये पुन्हा ड्रोन हल्ला झाला आणि त्यात दोन नागरिकांचा मृत्यू झाला. तसेच, काबूल विमानतळावर पुन्हा रॉकेट हल्ले सुरू झाले. गेल्या दोन दिवसांत पाचहून अधिक हल्ले या परिसरात झाले आहेत. हे हल्ले का होत आहेत? याचे कारण काबूल विमानतळावर अमेरिकन सैनिकांबरोबरच काही हजार अमेरिकन नागरिक अडकले आहेत. सुमारे 1000 अमेरिकन नागरिकांना काढून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुख्य म्हणजे तालिबानने अमेरिकेला 31 ऑगस्टपूर्वी आपले सर्व सैन्य माघारी न्यावे, असा धमकीवजा इशारा दिला आहे. बायडेन प्रशासनानेही ही मागणी मान्य केली आहे. असे असताना हे रॉकेट हल्ले कोण करीत आहे, यामागचे मुख्य कारण जाणून घेणे गरजेचे आहे.

सध्या अमेरिकन काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर रिपब्लिकन सिनेटर्स आणि काही डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य बायडेन प्रशासनावर अफगाणिस्तानातील आपली सैन्य उपस्थिती आणखी 10 ते 15 दिवस वाढवा, अशी मागणी करीत दबाव वाढवत आहेत. कारण, अद्यापही अमेरिकेचे आणि अन्य देशांचे अनेक नागरिक अफगाणिस्तानात अडकले आहेत. त्यामुळे काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक सेफ्टी झोन तयार करणे आवश्यक आहे. नाटोचे सदस्य असणार्‍या इंग्लंड आणि फ्रान्स या देशांकडूनही अशा प्रकारचा सेफ्टी झोन तयार करण्याची मागणी होत आहे. तसेच जोपर्यंत सर्व नागरीक तेथून बाहेर पडत नाहीत तोपर्यंत आपण तेथून हटता कामा नये, अशी त्यांची भूमिका आहे. यासाठीच इंग्लंड आणि फ्रान्सने संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची एक महत्त्वाची बैठकही बोलावली होती. या सर्व घडामोडींमुळे तालिबान आणि अफगाणिस्तानातील दहशतवादी गटांना अमेरिकेचे येथील वास्तव्य वाढण्याची भीती वाटत आहे. त्यामुळेच अमेरिकेने अशा प्रकारचा निर्णय घेऊ नये यासाठी हे दहशतवादी हल्ले केले जात आहेत. अमेरिकेने अफगाणिस्तानातील मुक्‍काम वाढवल्यास याहूनही भीषण हल्ले केले जातील, असा इशाराही देण्यात येत आहे.

हे हल्ले कोण करत आहे?

काबूलवर तालिबानचा कब्जा आहे. तालिबानमध्ये एकूण सहा गट आहेत. या गटांमधील हक्‍कानी गट हा सर्वांत प्रभावी आहे. या हक्‍कानी गटाकडे सध्या काबूलची जबाबदारी आहे. पिराजुद्दीन हक्‍कानी हा तालिबानचा उपाध्यक्ष आहे. हक्‍कानी गट हा पूर्णतः पाकिस्तान नियंत्रित दहशतवादी गट असून तो आयएसआयच्या इशार्‍यावर नाचणारा आहे. तालिबान हीदेखील पाकिस्तानने घडवलेली संघटना आहे. त्यामुळे तालिबान आणि हक्‍कानी हे एकाच माळेचे मणी आहेत. त्यामुळे या हल्ल्यांमध्ये नावे वेगवेगळी येत असली तरी त्यांचा कर्ताकरविता किंवा बोलवता धनी किंबहुना मास्टरमाईंड हा पाकिस्तान आहे. पाकिस्तान हे हल्ले जाणीवपूर्वक घडवून आणत आहे. कारण अफगाणिस्तानात कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेचे वास्तव्य पाकिस्तानला नको आहे. कारण अमेरिका बाहेर पडत नाही तोपर्यंत अफगाणिस्तानात पाकिस्तानला प्रभाव वाढवता येत नाही. पाकिस्तान हा अफगाणिस्तानकडे स्ट्रॅटेजिक डेप्थ म्हणून पाहतो. जर उद्या पाकिस्तानचे भारताशी युद्ध झाले तर अफगाणिस्तानचे पूर्ण समर्थन आपल्याला मिळावे, अशी पाकिस्तानची योजना आहे. चीनलाही अमेरिकेचा अफगाणिस्तानातील अधिवास नको आहे. कारण चीनलाही तेथे आपले पाय पसरायचे आहेत. त्यामुळे काबूलमध्ये होणारे हल्ले हे कोणत्याही एक-दोन दहशतवादी संघटना घडवत नसून यामागे पाकिस्तानची परिपूर्ण रणनीती आहे. अमेरिकेला 31 ऑगस्टपूर्वी अफगाणिस्तानातून पूर्ण सैन्य काढून नेणे शक्य नाही. कारण आजघडीला काबूलचे विमानतळ रॉकेट हल्ल्यांमुळे पूर्णतः बंद आहे. पण अमेरिकेने वास्तव्य वाढवले तर तेथे अशा स्वरुपाचे आणखीही हल्ले येणार्‍या काळात होऊ शकतात. या रॉकेट हल्ल्यांमुळे तालिबानने अफगाणिस्तानातील लोकांच्या सुरक्षेसंदर्भात केलेले दावेही फोल ठरत आहेत. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, तालिबान, हक्‍कानी, आयसिस खोरासन या सर्व अत्यंत हिंसक संघटना विशिष्ट अशा जहाल जिहादी विचारसरणीने प्रेरित आहेत. या संघटनांना आपल्या विचासरणीपुढे सामान्य माणसांचे आयुष्य शून्य महत्त्वाचे असते. आपल्या विचारसरणीचे अस्तित्त्व टिकवण्यासाठी या संघटनांकडून अमानुष कत्तली सर्रास केल्या जातात. त्यामुळे भविष्यातही अशा स्वरुपाचे हल्ले पाहायला मिळाल्यास नवल वाटायला नको. सबब, अफगाणिस्तानात अराजकाचे अंधःकारमय युग सुरू झाले आहे. येणार्‍या काळात अफगाणिस्तान हा पुन्हा एकदा हिंसेच्या गर्तेत लोटला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news