कन्नड घाटात दरड कोसळली; रस्ता खचल्याने नागरिकांसह शेकडो वाहने अडकली

नवी मुंबई; राजेंद्र पाटील : मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू होताच. खानदेशात चाळीसगावहून औरंगाबाद महामार्गावर कन्नड घाटात दरड कोसळली. यामुळे घाटातील रस्ता खचला असून शेकडो अवजड वाहने अडकून पडली आहेत. पहाटेपासून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची माहिती चाळीसगाव महामार्ग केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक कल्पना राठोड यांनी दिली.
आज पहाटेपासून खानदेशात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. काही तालुक्यात मध्यम तर काही तालुक्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. चाळीसगाव तालुक्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. येथून घाटरोड मार्गाने औरंगाबादला जाण्याचा मार्ग आहे.
या मार्गावर घाटरोड परिसरात पिरबाब मंदीर, बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले. तर पुढे कन्नड घाटात दरड कोसळली. यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. शिवाय या मार्गावर शेकडो वाहने दलदलीत अडकून पडली आहेत. ती बाहेर काढणे पोलीसांना अवघड होऊन बसले आहे.
पोलीस निरीक्षक हेमंत भामरे, एपीआय कल्पना राठोड आणि त्यांचे कर्मचारी रात्रीपासून वाहतूक वळविण्याचा प्रयत्न करत आहे.
पावसाचे प्रमाण कमी झाल्याशिवाय हा मार्ग सुरू करणे अशक्य असल्याचे राठोड यांनी स्पष्ट केले. अडकलेल्या वाहनांतील माणसांना बाहेर काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.
औरंगाबादहून येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग औरंगाबाद- कसारखेडेफाटा- नांदगाव मार्गाने येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तर औरंगाबादला जाण्यासाठी जळगाव मार्गाने यावे असे सांगितले आहे.
चाळीसगाव औरंगाबाद या मार्गावर खुलताबाद पोलिसांचे मदत केंद्र आहे. घाटात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, वाहनांबाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.