चाकण : अश्लील व्हिडिओ कॉल करून ब्लॅकमेलिंग; अनेकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न | पुढारी

चाकण : अश्लील व्हिडिओ कॉल करून ब्लॅकमेलिंग; अनेकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न

चाकण; पुढारी वृत्तसेवा: व्हिडिओ कॉलद्वारे समोरच्या व्यक्तीचा अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून लाखो रुपयांची मागणी करत ब्लॅकमेल करण्याचे प्रकार केले जात असल्याच्या धक्कादायक बाबी समोर येत आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी न करता परस्पर या घटना मिटवण्याचा प्रयत्न होत असल्याने अशा प्रवृत्तींचे फावले आहे. सहजासहजी इंटरनेट उपलब्ध होत असल्यामुळे सोशल मीडियाचे जाळे हे दिवसेंदिवस मजबूत होत चालले आहे. सोशल मीडियाच्या जगात अश्लील व्हिडिओ, अश्लील जाहिराती या तरुणाईच्या गळ्याभोवती फास आवळत आहेत. खेड तालुक्यात अनेकांना व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून अश्लील संदेश पाठवून व्हिडिओ कॉल करण्यास प्रवृत्त केले जात आहे.

अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. व्हिडिओ कॉलद्वारे ब्लॅकमेल करण्याचा नवा फंडा सुरू झाला आहे. नागरिकांनी यापासून सावध राहण्याची गरज आहे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. पोलिसांचा सायबर क्राईम विभाग अशा बनावट फोन कॉल आणि फेसबुक, इन्स्टाग्रामवर असलेल्या बनावट अकाउंट्सपासून सावध राहण्याचा इशारा देत आहे.

अनेकदा व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून आलेल्या अश्लील संदेशांना भुलून धनाढ्य व्यक्ती आणि तरुणाई अशा व्हिडिओंकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होताना दिसत आहेत. व्हिडिओ कॉलद्वारे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून फसवणूक आणि पैशांसाठी ब्लॅकमेल होण्याची भीती असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. व्हिडिओ कॉल करण्यासाठी प्रवृत्त करणारे व्हॉटसअ‍ॅप मेसेज अनेकांना येत आहेत. अशा मेसेजला बळी न पडण्याचे आवाहन सायबर क्राइम विभागाने केले आहे.

 

 

 

 

Back to top button