आंबेगावात शेतांमध्ये वाढले तण; सततच्या पावसाचा परिणाम | पुढारी

आंबेगावात शेतांमध्ये वाढले तण; सततच्या पावसाचा परिणाम

महाळुंगे पडवळ; पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम व उत्तर भागात सतत रिमझिम पाऊस पडत आहे. यामुळे शेतात गवत, तणांची वाढ झाली आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी महागड्या तणनाशकांचा वापर करत आहेत. मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा तणनाशकाचे भाव दुप्पट झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. कृषी तज्ज्ञ राजेंद्र मोढवे म्हणाले, ‘मागील महिन्यापासून या भागात सतत रिमझिम पाऊस पडत आहे. त्यात वातावरणही दमट असून ते कीड व तण यांना पोषक आहे. पालेभाज्या वर्गीय पिके व बटाटा, मका, सोयाबीन आदी पिकांवरही मोठ्या प्रमाणात कीड पडलेली आहे.

त्यात शेतात पाणी साचून राहिल्याने गवत आणि तणांत वाढ झाली आहे. वेळेत खुरपणी निंदणी न करता आल्याने पिकात सर्व गवत वाढत आहेत. त्यात ऊन पडत नसल्याने फवारणी करता येत नाही.’ ग्लायकोफॉससारख्या तणनाशकचा कच्चा माल आखाती व चिनी देशातून येत आहे. तण नाशकाची मागील वर्षी शंभर ग्रॅमसाठी 55 ते 70 रुपयापर्यंत असलेल्या किमती यंदा 100 ते 150 रुपयांपर्यंत गेली आहे. त्यातच मजूर मिळत नाहीत. तणनाशके महागले आहेत. त्यामुळे शेतात सर्वत्र तण व गवत वाढल्याचे चित्र सर्वत्र दिसूत येत असल्याचे त्यांनी सांगितले

Back to top button