महापालिका आयटीआयमधील 90 टक्के विद्यार्थ्यांना कंपन्यांतून मिळतेय रोजगाराची संधी | पुढारी

महापालिका आयटीआयमधील 90 टक्के विद्यार्थ्यांना कंपन्यांतून मिळतेय रोजगाराची संधी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि कासारवाडी येथील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकणार्‍या 90 टक्के मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. कंपन्यांमध्ये कुशल मनुष्यबळाची गरज असल्याने कंपन्यांमधून आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. त्याशिवाय, आयटीआय ट्रेड केलेले विद्यार्थी नोकरी करून कालांतराने स्वयंरोजगार निर्माण करत आहेत. अभ्यासात कच्ची किंवा ज्यांच्याकडे घरातील गरीब परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी पैसा नसतो, अशी मुले आयटीआयकडे वळतात, असे पूर्वी मानले जात होते; मात्र,आता परिस्थिती बदलली आहे.

90 टक्के मिळविणारे विद्यार्थीदेखील आयटीआयचा पर्याय निवडत आहेत. त्याशिवाय, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल अभ्यासक्रमाची पदवी, पदविका परीक्षा उत्तीर्ण न झालेले विद्यार्थीदेखील आयटीआयचा पर्याय निवडत आहेत. मोरवाडीतील आयटीआयमध्ये 800 तर, कासारवाडी आयटीआयमध्ये 140 प्रवेश क्षमता आहे. मोरवाडी आयटीआयमध्ये दरवर्षी साधारण 500 विद्यार्थी प्रवेश घेतात. तर,It कासारवाडी आयटीआयमध्ये 120 विद्यार्थिनी प्रवेश घेतात. त्यापैकी 90 टक्के विद्यार्थ्यांना नोकरी-व्यवसायाची संधी मिळत आहे.

कंपन्यांमध्ये प्रशिक्षणासाठी प्रयत्न
आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांमध्ये ट्रेड करत असतानाच 3 ते 6 महिन्यांचे प्रत्यक्ष कंपनीत प्रशिक्षण मिळावे, यासाठी सध्या प्रयत्न सुरु आहेत. त्याबाबत कंपन्यांशी चर्चा सुरु असल्याची माहिती प्राचार्य शशिकांत पाटील यांनी दिली.

कंपन्यांच्या मागणीनुसार पूर्तता
कंपन्यांना कुशल मनुष्यबळाची गरज असते. त्यामुळे आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळते. आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम शिकाऊ कामगार (अ‍ॅप्रेंटिसशिप) म्हणून घेण्यात येते. सुरुवातीला 15 ते 20 हजार रुपये पगारावर त्यांना काम करावे लागते. मात्र, ठराविक कालावधीनंतर त्यांना पगार वाढवून कंपनीत कायमस्वरुपी किंवा कंत्राटी तत्त्वावर घेण्यात येते.
कमी गुण मिळालेलेच विद्यार्थी आयटीआयला येतात, ही संकल्पना सध्या बाजूला पडली आहे. पदवी शिक्षण घेतलेल्या मुली देखील कासारवाडी आयटीआयमध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत आहेत. त्याशिवाय, 90 टक्क्यांपर्यंत गुण मिळालेले विद्यार्थी देखील आयटीआयचा पर्याय स्वीकारताना दिसत आहेत. कंपन्यांना कुशल मनुष्यबळाची गरज असल्याने प्राधान्य आयटीआय करणार्‍या विद्यार्थ्यांना मिळत आहे.
– शशिकांत पाटील, प्राचार्य,
पिंपरी-चिंचवड मनपा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडी.

मी 2016-17 मध्ये महापालिकेच्या कासारवाडी आयटीआयमधून फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर मी काही वर्ष घरुनच काम केले. गेल्या एक वर्षापासून मी चिंचवड स्टेशन येथे स्वतःचे बुटीक सुरु केले आहे. मला आयटीआयच्या प्रशिक्षणामुळे स्वयंरोजगाराचा मार्ग सापडला.
– सुवर्णा आगवणे, व्यावसायिक

 

Back to top button