विद्यार्थिनींशी लज्जास्पद वर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाला तीन दिवसांची पोलिस कोठडी | पुढारी

विद्यार्थिनींशी लज्जास्पद वर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाला तीन दिवसांची पोलिस कोठडी

बारामती : भिगवण (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहावीच्या विद्यार्थिनींशी लज्जास्पद वर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या दादासाहेब अंकुश खरात (वय 42, रा. कल्याणीनगर, बारामती) याला येथील सत्र न्यायाधीश जे. ए. शेख यांनी सोमवार (दि. 22) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. भिगवणचे पोलिस उपनिरीक्षक रूपेश कदम यांच्याकडून त्याचा रिमांड रिपोर्ट शनिवारी न्यायालयात सादर करण्यात आला.

खरात याच्या विरोधात विनयभंगासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दि. 18 रोजी त्याला अटक करण्यात आली. तो वर्गशिक्षक असलेल्या सहावीतील विद्यार्थिनींशी त्याने गैरवर्तन केले. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी याबाबत फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.या वेळी सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. स्नेहल नाईक-बडवे यांनी काम पाहिले. अ‍ॅड. नाईक यांनी न्यायालयासमोर बाजू मांडताना सांगितले की, खरात हा आठवीच्या वर्गाला शिकविण्यासाठी असताना त्याने गैरप्रकार केला होता.

Back to top button