बारामती : खूनप्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात | पुढारी

बारामती : खूनप्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात

बारामती; पुढारी वृत्तसेवा: बारामतीतील श्रीरामनगर भागात गुरुवारी (दि. 18) झालेल्या शशिकांत बाबासाहेब कारंडे (वय 47, मूळ रा. मठाचीवाडी, ता. फलटण, जि. सातारा, सध्या रा. एचडीएफसी बँकेमागे, त्रिवेणी अपार्टमेंट, भिगवण रोड, बारामती) यांच्या खूनप्रकरणी शहर पोलिसांनी तिघा अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. गुरुवारी सायंकाळी मुलीला आणण्यासाठी गेलेल्या शशिकांत कारंडे यांच्यावर कुर्‍हाड व सत्तूरने तिघांनी वार करत त्यांचा खून केला होता.

भरदिवसा घडलेल्या या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर पोलिसांची पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली होती. पोलिसांनी काही तासांतच आरोपींना ताब्यात घेतले.

डोळ्यांदेखत झाला वडिलांचा खून
कारंडे हे गुरुवारी मुलीला शाळेतून आणण्यासाठी गेले होते. त्यांची मुलगी मैत्रिणीसह त्यांची वाट पाहत होती. तिच्या डोळ्यांदेखत तिघा अल्पवयीनांनी कुर्‍हाड, सत्तूरने शशिकांत कारंडे यांचा पाठलाग करत त्यांच्यावर एकूण 18 वार केले. त्यात ते गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. श्रीरामनगरमधील अनेक नागरिकांनी खुनाचा हा प्रकार पाहिला. मुलीच्या डोळ्यांदेखत वडिलांचा निर्घृण पद्धतीने खून केला गेला.

Back to top button