वारवंड येथे घराचे छत कोसळले | पुढारी

वारवंड येथे घराचे छत कोसळले

भोर; पुढारी वृत्तसेवा: मुसळधार पावसामुळे वारवंड (ता. भोर) येथे बुधवारी (दि.17) रात्री घराचे छत कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. आनंदा खंडू दिघे, राजाराम विठोबा दिघे व अशोक बबन मोरे यांचे एकच आढे असलेले हे एकत्रित कौलांचे घर आहे. गेल्या आठ- दहा दिवसांपासून हिर्डोशी भागात वार्‍यासह मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे रात्री अकराच्या सुमारास या घराचे छत कोसळले. यामुळे घरातील धान्य, जीवनावश्यक साहित्यासह इतर वस्तूंचे नुकसान झाले आहे. सुदैवाने पडझडीदरम्यान घरात कोणी नव्हते, त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही.

निगुडघर मंडल अधिकारी पांडुरंग लहारे, गटविस्तार अधिकारी विजय कोळी, तलाठी गोवर्धन पंडित यांनी या घराचा गुरुवारी पंचनामा केला. नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी सरपंच व ग्रामस्थांनी केली आहे. उपसरपंच संतोष दिघे, सचिन देवकर, ग्रामसेवक विकास सोनवणे, पोलिस पाटील सुधीर दिघे, शंकर मोरे, वसंत चौधरी, कोतवाल संघटेचे अध्यक्ष पांडुरंग किंद्रे व ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

Back to top button