सीताफळाला मिळतोय उच्चांकी भाव | पुढारी

सीताफळाला मिळतोय उच्चांकी भाव

दिवे : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यात सध्या सीताफळाचा हंगाम जोरात सुरू आहे. इथल्या शेतकर्‍यांचे अर्थकारण सीताफळावर अवलंबून असते. या वर्षी सुरुवातीच्या काळात पावसाने ओढ दिल्याने तसेच जास्त उष्णतेमुळे बागेत फलधारणा कमी झाली. त्यामुळे बाजारात मालाची आवक कमी होत असून, बाजारभावही चांगला मिळत आहे. तालुक्यातील शेतकरी सासवड, दिवे, गुर्‍होळी या बाजारपेठांतच आपला माल विकतात. सासवड बाजारपेठेत आज साधारण पाचशे ते सहाशे कॅरेट सीताफळाची आवक झाली.

दिवे येथे दोनशे कॅरेट सीताफळ आवक झाली. बाजारात मालाची आवक कमी असल्याने सीताफळाला उच्चांकी भाव मिळत आहे.
राज्यभरात सध्या सीताफळाची लागवड वाढत आहे. मात्र, पूर्वापार पुरंदर वाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या इथल्या सीताफळाला देशभरात व परदेशात प्रचंड मागणी आहे. आज झालेल्या आवकेमध्ये राहुल बोरकर या शेतकर्‍याच्या एक कॅरेट सीताफळास एकतीसशे रुपयांचा भाव मिळाला. नवनाथ भापकर या शेतकर्‍याचे तीन हजार, तर नवनाथ मुरलीधर काळे व पोपट झेंडे यांचे एक कॅरेट पंचवीसशे रुपयांना विकले गेले. बाजारात सध्या पुणे, मुंबईसह परराज्यांतील व्यापारी सीताफळे खरेदी करण्यासाठी दाखल झाले आहेत.

परंतु, वरील सर्व शेतकर्‍यांच्या मालाला नितीन काळे, गौरव काळे, तुषार झेंडे, शंकर झेंडे, विशाल तळेकर या व्यापार्‍यांनी सर्वांत जास्त बोली लावत माल खरेदी केला. हा सर्व माल पॅकिंग करून दिल्ली, कोलकाता व इतर राज्यांत पाठविला जाईल, असे त्यांनी सांगितले. या सर्व शेतकर्‍यांचे एक सीताफळ साधारण पन्नास रुपयांच्या आसपास विकले गेले. त्यामुळे सीताफळ उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

सीताफळ काळी पडत असतील तर…
सध्याच्या हवामानामुळे सीताफळ काळी पडत असतील, तर शेतकर्‍यांनी एक टक्का बोर्डो मिश्रण किंवा बाविस्टिन एक ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड दोन ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून आलटूनपालटून फवारणी करावी. तसेच पिठ्या ढेकूण नियंत्रणासाठी बुप्रोफेझीन 2 मिली प्रतिलिटर पाण्यातून फवारावे, असे आवाहन कृषी पर्यवेक्षक गणेश जगताप यांनी केले आहे.

Back to top button