पुणे : नऊ हजार विद्यार्थ्यांची दुसर्‍या फेरीकडे पाठ; तिसरी फेरी आजपासून | पुढारी

पुणे : नऊ हजार विद्यार्थ्यांची दुसर्‍या फेरीकडे पाठ; तिसरी फेरी आजपासून

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील दुसर्‍या फेरीतील प्रवेशांसाठीची मुदत बुधवारी (दि. 17) संपली. या फेरीत जवळपास नऊ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. गुरुवारपासून प्रवेश प्रक्रियेची तिसरी फेरी सुरू करण्यात येणार असून, या फेरीची गुणवत्ता यादी 22 ऑगस्टला जाहीर करण्यात येईल. यंदा अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 1 लाख 8 हजार 830 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी 85 हजार 240 जागा केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे भरल्या जाणार आहेत.

पहिल्या फेरीत 25 हजार 799 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता, तर दुसर्‍या फेरीत 17 हजार 62 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला होता. संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, बुधवारी सायंकाळपर्यंत केंद्रीय प्रवेशांद्वारे एकूण 33 हजार 260, तर राखीव जागांसह एकूण 40 हजार 235 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. प्रवेश प्रक्रियेतील तिसर्‍या फेरीच्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना 18 ऑगस्टला रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात येईल.

तसेच 18 आणि 19 ऑगस्ट या कालावधीत नवीन अर्ज नोंदणीसह प्रवेश अर्जाचा भाग दोन भरून महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवता येतील. 22 ऑगस्टला तिसर्‍या फेरीची गुणवत्ता यादी आणि महाविद्यालयांचे प्रवेश जाहीर करण्यात येतील. या कालावधीत राखीव जागांवरील (कोटा) प्रवेश प्रक्रिया, द्विलक्ष्यी (बायफोकल) अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू राहील. 24 ऑगस्टला कनिष्ठ महाविद्यालयांना कोट्यातील जागा समर्पित करता येतील. तर 25पासून पुढील फेरीची प्रक्रिया राबवण्यात येईल.

Back to top button