पुणे जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावर 75 नियुक्त्या | पुढारी

पुणे जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावर 75 नियुक्त्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दोन वर्षांत पुणे जिल्हा परिषदेने अनुकंपा तत्त्वावर 75 हून अधिक नियुक्त्या दिल्या आहेत. डिसेंबर 2022 पर्यंत उपलब्ध रिक्त पदांसाठी अनुकंपा तत्त्वावर सर्व संभाव्य नियुक्त्या पूर्ण केल्या आहेत. पदोन्नतीमुळे मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. सध्या अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी 232 व्यक्ती प्रतीक्षा यादीत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. जिल्हा परिषदेत आरोग्य सेविका संवर्गातील 54 पदे रिक्त आहेत; परंतु अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांमध्ये शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार नाहीत.

बहुतेक उमेदवारांकडे नर्सिंग प्रमाणपत्र नव्हते; म्हणून ते या पदासाठी पात्र नव्हते. पुणे जिल्हा परिषदेने नियुक्तीसाठी शैक्षणिकदृष्ट्या पात्र असलेल्या परंतु नर्सिंग प्रमाणपत्र नव्हते, अशा सर्व महिलांना आमंत्रित केले. त्यांना नर्सिंग कोर्स करण्याच्या सूचना केली. हा अभ्यासक्रम देणार्‍या चार सरकारी आणि खासगी संस्थांनी आपले सादरीकरण केले. तीन बँकांच्या प्रतिनिधींनी शैक्षणिक
कर्ज आणि त्याच्याशी संबंधित अटींबद्दल सांगितले, असेही प्रसाद यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेअंतर्गत सेवेत असताना विविध कारणांमुळे मृत्यू झालेल्या कर्मचार्‍यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर ज्येष्ठता यादीनुसार रिक्त पदांवर नियुक्ती दिली जात आहे. शैक्षणिक अर्हता पात्र नसल्याने काही उमेदवारांना नियुक्ती देता येत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेमार्फत अनुकंपा नियुक्ती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. डिसेंबरअखेर रिक्त होणार्‍या जागांवर अनुकंपा भरती केली जाणार आहे. अजूनही 232 व्यक्ती अनुकंपा नियुक्तीवरून प्रतीक्षा यादीत आहेत. त्यातील पात्र उमेदवारांना फेब—ुवारी 2023 अखेर नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

Back to top button