सोमेश्वरने फोडली ऊस दराची कोंडी; कारखाना देणार 3020 रु. दर | पुढारी

सोमेश्वरने फोडली ऊस दराची कोंडी; कारखाना देणार 3020 रु. दर

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा: राज्यात अग्रेसर असलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने मागील गळीत हंगामाच्या ऊस दराची कोंडी फोडली आहे. सोमेश्वरने 2021- 22 या हंगामात तुटून आलेल्या उसाला प्रति टन 3020 रुपये दर जाहीर केला आहे. शुक्रवारी (दि. 12) रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब केले.गेल्या वर्षी गाळप केलेल्या उसासाठी सोमेश्वर कारखान्याने तसेच माळेगाव व जरंडेश्वर कारखान्याला गाळापासाठी दिलेल्या 14 लाख 46 हजार टन उसाला हा दर जाहीर करण्यात आलेला आहे.

सोमेश्वरने यापूर्वीच टनाला 2867 अदा केलेआहेत. आता उर्वरित 219 रुपये दिवाळीच्या आसपास अदा करण्यात येणार आहे. तसेच एफआरपी वरील 1 कोटी 10 लाख रुपयांचे व्याज देखील सभासदांना मिळणार असल्याची माहिती सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप
यांनी दिली. विविध विषयावर बैठकीत निर्णय झाले. यामध्ये सभासदांच्या हितासाठी संचालक मंडळाने चांगला निर्णय घेतल्याचे सभासदांनी सांगितले.

यावेळी उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, संचालक राजवर्धन शिंदे, संग्राम सोरटे यांच्यासह संचालकमंडळ उपस्थित होते. त्यामुळे सोमेश्वर कारखाना दिवाळीला किती बिल काढणार याकडे सर्व सभासदांच्या नजरा लागल्या होत्या. त्याला आता पूर्ण विराम मिळाला आहे. सोमेश्वर आजपर्यंत दराबाबतीत नेहमीच अग्रेसर राहिला असून यापुढेही सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातील असे मत पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केले.

Back to top button