येरवडा : रस्त्यावरील पाण्याने घेतला तरुणाचा बळी; लोहगाव- वाघोली रस्त्यावरील घटना | पुढारी

येरवडा : रस्त्यावरील पाण्याने घेतला तरुणाचा बळी; लोहगाव- वाघोली रस्त्यावरील घटना

येरवडा; पुढारी वृत्तसेवा: कर्मभूमीनगरजवळ रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यात पडून सयाजी जगन्नाथ वाघमारे (वय 25, रा. लोहगाव, मूळ रा. पंढरपूर) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. रात्री नऊच्या सुमारास काम संपवून दुचाकीवरून घरी जात असताना काळाने त्याच्यावर घाला घातला. मूळचे पंढरपूरचे असलेले वाघमारे हे लोहगाव परिसरात आई, वडील, बहीण यांच्यासोबत भाड्याने राहात होते. ते अविवाहित होते. डम्पर तसेच जेसीबी चालवायचे काम ते करत होते.

लोहगाव-वाघोली रस्त्यावर कर्मभूमीनगरजवळील रस्त्यावर मागील आठ दिवसांपासून पावसाचे पाणी साठले आहे, त्यामुळे रस्त्यावर पाण्याचे तळे झाले आहे. या पाण्याचा निचरा होण्यासंदर्भात वारंवार मागणी करण्यात आली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने वाघमारे याचा मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे. ही बाब गंभीर असून आणखी किती बळी गेल्यानंतर महापालिका प्रशासन जागे होणार असा प्रश्न लोहगाव-वाघोली रोड विकास मंचच्या वतीने उपस्थित करण्यात आला.

अपघाताच्या निषेधार्थ नागरिकांनी काही वेळ पाण्यात उतरून आंदोलन केले. यामध्ये मोहनराव शिंदे, स्वप्निल खांदवे, मदन मोहन ठाकूर यांसह लोहगाव- वाघोली नागरिक विकास मंचचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. पाण्याचा निचरा करण्यास कोणी अडथळा करत असेल तर पोलिस तैनात करून रस्त्यावरील पाणी काढण्यात यावे, अशी मागणीही मंचच्या वतीने करण्यात आली. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी दीपक खांदवे यांनी केली.

पाण्याचा निचरा करण्यासाठी यंत्रणा लावण्यात आली होती. या वेळी येथील स्थानिक नागरिकांनी काम करू दिले नाही. याबाबत वरिष्ठांशी बोलून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
– अमर मतीकुंड, उपअभियंता

 

Back to top button