कॅम्पमधील मार्केटची दुरुस्ती अखेर सुरू; निधीअभावी खर्चात मात्र कपात | पुढारी

कॅम्पमधील मार्केटची दुरुस्ती अखेर सुरू; निधीअभावी खर्चात मात्र कपात

पुणे; पुढारी वृत्तसेवा: लष्कर भागातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटच्या दुरुस्तीला अखेर मुहूर्त मिळाला असून, प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे. दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. मात्र, त्यात आता कपात करण्यात आली असून, आमदार सुनील कांबळे यांनी दिलेला 25 लाखांचा निधी वेळेत खर्च न झाल्याने तो परत गेला आहे. मार्केटच्या दुरुस्ती भूमिपूजन प्रसंगी पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे, पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष सचिन मथुरावाला, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता मैथिली झांजुर्णे, अर्चना देशमुख, शाखा अभियंता अनिल काकडे, व्यापारी संघटनेचे मंजूर शेख आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज मार्केटला मार्च 2021 मध्ये आग लागून 25 दुकाने जळून खाक झाली होती. त्यावेळी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दुरुस्ती तत्काळ करू, असे आश्वास दिले. मात्र, त्याचा सर्वांनाच विसर पडला होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे व्यापारी संघटनेने दुरुस्तीची मागणी केली होती. त्यानुसार एकूण खर्चाच्या 50 टक्के निधी देऊ, असे आश्वासन पवार यांनी दिले होते. त्यानुसार एक कोटी 19 लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीतून सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आला, परंतु कँटोन्मेंट बोर्ड आपला हिस्सा बांधकाम विभागाला देऊ शकला नाही.

दरम्यान, मार्केटमधील व्यापार्‍यांनी आपल्याकडील थकीत भाड्यापोटी सुमारे 26 लाख रुपयांचा भरणा बोर्डाकडे केला, तर सामाजिक दायित्व निधीच्या (सीएसआर) माध्यमातून 25 लाख रुपये गोळा केले जाणार होेते. मात्र, त्यावर कार्यवाही झालेली नाही. मार्केट दुरुस्ती वेळेत न झाल्याने व्यापार्‍यांना उघड्यावरच व्यवसाय करावा लागत आहे. दरम्यान, व्यापार्‍यांनी आंदोलनाची भूमिका घेतल्याने बोर्डाने आपला वाटा बांधकाम विभागाकडे जमा केला. स्थानिक आमदार सुनील कांबळे यांनी दुरुस्तीसाठी दिलेला 25 लाख रुपयांचा निधी वेळेत काम सुरू न झाल्याने तो परत गेला आहे.

Back to top button