माऊलींसाठी आली मुक्ताईची राखी | पुढारी

माऊलींसाठी आली मुक्ताईची राखी

आळंदी : श्रीकांत बोरावके :  काम क्रोध मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ असा उपदेश ज्ञानेश्वर माऊलींना देणार्‍या त्यांच्या लहान भगिनी संत मुक्ताईंना वारकरी संप्रदायात मोठे आदराचे स्थान आहे. आपला संताप सोडून जगाच्या कल्याणासाठी ज्ञानदेवांकडे पसायदान मागणार्‍या मुक्ताईंच्या भगिनी प्रेमाची आठवण देणारा प्रसंग पुन्हा येण्याचा योग मुक्ताई संस्थानामुळे जुळून आला. मुक्ताईनगर, कोथळी आणि श्री क्षेत्र मेहुण या तीन ठिकाणच्या मुक्ताई संस्थानांनी हे काम केले आहे.

संस्थानांकडून संत मुक्ताईच्या वतीने भाऊ संत ज्ञानदेवांसाठी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानकडे राखी अर्पण केली. बहीण-भावाच्या या गोडप्रेमाची परंपरा यंदाही कायम ठेवली. इंद्रायणी नदीच्या घाटांनी, सिद्धेश्वराच्या कळसाने, सुवर्ण पिंपळाच्या पानांनी, देऊळ वाड्याने आणि अवघ्या अलंकापुरीने हे प्रेम यंदाही अप्रत्यक्षरीत्या अनुभवले. पहाटे नित्य पूजा व पवमान अभिषेकानंतर सकाळी माऊलींना राख्या अर्पण केल्या. मुक्ताई देवस्थान, मेहुण येथून तरफडे महाराजांनी राखी अर्पण केली. आदिशक्ती मुक्ताई संस्थान, मुक्ताईनगर यांच्या वतीने देवस्थानचे विश्वस्त संदीप पाटील व अंकिता पाटील यांच्या हस्ते पवमान अभिषेक, दुधारती व महापूजा केली.

त्यानंतर माऊलींच्या समाधीवर राखी अर्पण केली. श्री संत ज्ञानेश्वर माऊलींतर्फे मुक्ताबाईला साडी चोळी भेट देण्यात आली. या वेळी विशाल महाराज खोले, दीपक महाराज, सागर महाराज, गणेश महाराज, प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदी मान्यवर उपस्थित होते. ज्ञानदेवांप्रमाणे निवृत्ती नाथ महाराज, सोपान महाराज यांनाही राख्या पाठविण्यात आल्या.

Back to top button