भोसरीत ठिकठिकाणी पाण्याचे डबके | पुढारी

भोसरीत ठिकठिकाणी पाण्याचे डबके

भोसरी : परिसरात पावसाने दोन दिवसांपासून हजेरी लावल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेले आहे. पाऊस पडला की भोसरी परिसरात पाणी साचण्याचे प्रकार सतत घडत आहेत. पालिका प्रशासनाने नागरिकांचे हित लक्षात घेता तातडीने उपाययोजना करून या समस्यातून सुटका करण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. नळाला गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी येणे, सखल भागात पाणी साचणे, पावसामुळे रस्ता चिखलमय होणे, अनेक भागातील वीज जाणे, ड्रेनेजचे पाणी घरात शिरत असल्याच्या घटना भोसरी परिसरात पावसाळ्यात घडत असतात. परंतु, या समस्या सोडविण्यास नेहमीच चलढकल होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

ई क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभागाचा फटका परिसरातील नागरिकांना सोसावा लागत आहे. अनेक ठिकाणी भोसरी परिसरात स्थापत्यविषयक कामे सुरू आहेत. त्यासाठी रस्त्यासाठी खोदकाम केल्याने पाणी साचत असलेले दिसून येत आहे.
पाणी साचत असल्यामुळे अनेकांनी स्थापत्य विभागाचा भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. परिसरातील मुख्य रहदारीचा रस्त्यावर पाणी साचल्याने परिसरात वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. वाहनांना पर्यायी दुसरा मार्गही नसल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे. यावर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

या ठिकाणी नियमित साचते पाणी
महापालिकेची सावित्रीबाई फुले शाळा, आदिनाथनगर, पीसीएमटी चौक, बापुजी बुवा चौक, राजमाता जिजाऊ उड्डाणपूल परिसर, चक्रपाणी वसाहत रस्ता, इंडस्ट्रियल एरिया.

Back to top button