तळेगाव दाभाडे : पावसाने भात पिकाला जीवदान | पुढारी

तळेगाव दाभाडे : पावसाने भात पिकाला जीवदान

तळेगाव दाभाडे; पुढारी वृत्तसेवा: गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने तालुक्यात पुन्हा सुरुवात केली आहे. त्यामुळे भात पिकाला जीवदान मिळाले आहे. लागवड झालेले भात पीक चांगलेच तरारले असल्याने शेतकरी वर्गात समाधान आहे. मावळ तालुका भातपिकाचे कोठार समजले आहे. येथील 80 ते 90 टक्के शेतकरी भातपीक घेतात. यावर्षी देखील भातपिकाची लावगड मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. यावर्षी जुन महिन्यात पावसाने मोठा ताण दिला होता. त्यामुळे भात लावगडी संथगतीने झाल्या होत्या.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी भात लावगडी पूर्ण केल्या. त्यानंतर गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारली होती. पावसाअभावी भात खाचरे कोरडी पडली होती. त्यामुळे पुन्हा शेतकर्‍यामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. पावसाने ताण दिल्यास लागवड झालेल्या भात पिकाचे काय, या चिंतेत शेतकरी असतानाच गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे

. मावळ तालुक्यात सुमारे 13 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर खरीप भातपिक घेण्याचे नियोजन तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ आणी त्याचे सर्व अधिकारी वर्गाने केलेले असून, त्याप्रमाणे सर्वजण प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या शेतावर जाऊन मार्गदर्शन आणि माहिती देत असतात. मावळ तालुक्यातील काही शेतकर्‍यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यंदाची भात लावगड केली असल्याची माहिती कृषी सहायक अधिकारी अक्षय ढूमणे यांनी सांगितली. गेली दोन तिन दिवस पावसाची जोरदार पणे सुरूवात झाल्या मुळे भात खाचरात पाणी साठू लागले आहे. त्यामुळे चिंताग्रस्त होऊ पहात असलेला शेतकरी बांधव सुखावला आहे.

Back to top button