तरुणींवर ‘लखोबा’चा ट्रॅप; बलात्कार करून तरुणींच्या नावावर घेतले लाखोंचे कर्ज | पुढारी

तरुणींवर ‘लखोबा’चा ट्रॅप; बलात्कार करून तरुणींच्या नावावर घेतले लाखोंचे कर्ज

पुणे; पुढारी वृत्तसेवा: तरुणाचे नाव शांतनू गंगाधर महाजन.. उच्चशिक्षित.. हायफाय पद्धतीचे राहणीमान… मूळचा वाशिमचा, सध्या पुण्यातील खराडी परिसरात वास्तव्य. बोलणे मधाळ… समोरच्याचे शांत ऐकून घेण्याची सवय. त्याची भेटीवेळची एन्ट्री एवढी कडक, की पाहताच तरुणी म्हणते, हाच तो माझा जोडीदार. मात्र, याच शांतनूचे कारनामे ऐकून तुम्हीदेखील चक्रावून जाल. शांतनूने शादी डॉट कॉम या विवाहविषयक संकेतस्थळावर तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात खेचून लग्नाच्या आमिषाने बलात्कार केला. एवढेच नाही, तर त्यांच्या नावावर लाखोंचे कर्ज उचलले. त्याने आत्तापर्यंत अशा पद्धतीने दोन तरुणींना आपल्या जाळ्यात खेचून कंगाल केले आहे.

त्याच्या फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्याचे पोलिस सांगतात. शांतनू याच्यावर आत्तापर्यंत शहरातील चंदननगर आणि येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असून, सध्या तो चंदननगर पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात येरवडा कारागृहात आहे. शांतनू याने विवाहविषयक संकेतस्थळावर आपली नोंदणी केली आहे. दिसायला सुंदर आणि चांगल्या पगाराची नोकरी असलेल्या तरुणींना तो हेरतो. त्यानंतर त्यांच्याशी ओळख केल्यानंतर मैत्री वाढली, की लग्नाच्या आमिषाने तो तरुणींना जाळ्यात खेचतो. येथेच तरुणी त्याच्या आकर्षक बोलण्याला फसतात आणि ट्रॅपमध्ये अडकतात.

त्यानंतर तो तरुणींसोबत लग्नाच्या आमिषाने हॉटेलमध्ये नेऊन शरीरसंबंध ठेवतो. हॉटेल किंवा लॉजमध्ये असताना, तरुणी बाथरूमध्ये गेली की तो मोबाईल घेतो. गेम डेव्हलपर करण्याच्या कंपनीत तो काम करीत असल्याने त्याला तांत्रिक माहिती आहे. अवघ्या काही मिनिटांत तो मोबाईलमधील माहिती चोरी करून विविध लोन अ‍ॅप व इतर ठिकाणांहून कर्ज घेतो. तरुणीला माहिती झाले तरी तो तिला आपल्या बोलण्यात अडकवून आपण लग्न करणार आहोत, मी चांगल्या नोकरीला आहे, असे सांगून परत लोन घेतो, तसेच तरुणींना आपले घरदेखील दाखवतो. त्याचा झगमगाट पाहून एका तरुणीने तर त्याला बँकेतून लोनसुद्धा काढून दिले आहे. मात्र, दिवसेंदिवस लोनचा आकडा वाढत गेल्यानंतर अन् लग्न न केल्यामुळे आपण फसल्याचे लक्षात येताच तरुणींनी पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.

शांतनू याच्यावर चंदननगर पोलिस ठाण्यातदेखील अशाच प्रकारचा गुन्हा दाखल आहे, असे पोलिस निरीक्षक (गुन्हे) उत्तम चक्रे यांनी सांगितले आहे. तर, विवाहविषयक संकेतस्थळावर अनोळखी व्यक्तीसोबत संपर्क निर्माण करण्यापूर्वी त्याची योग्य प्रकारे खात्री करा. तसेच आर्थिक व्यवहार टाळा, असे आवाहन सायबर व स्थानिक पोलिसांनी केले आहे. लग्नाच्या बहाण्याने एका तरुणीला लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला; तसेच तिचा ई-मेल आयडी घेऊन त्यावर तब्बल 14 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. शादी डॉट कॉम या वेबसाईटवर दोघांची ओळख झाली होती. याप्रकरणी लोहगाव येथील एका 29 वर्षांच्या तरुणीने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी शांतनू गंगाधर महाजन (वय 28, रा. रिव्हरडेल सोसायटी, खराडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार विमाननगरमधील लेमन ट्री हॉटेल, हिंदुस्थान हॉटेल येथे 29 जून ते आतापर्यंत घडला आहे. लग्नाच्या आमिषाने शरीरसंबंध ठेवले. 25 लाखांचे कर्ज घेऊन दुसर्‍या तरुणीशी लग्नगाठ बांधली. शादी डॉट कॉमवरून दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून त्याने तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले. तिच्या मोबाईलवरून 25 लाख रुपयांचे कर्जदेेखील घेतले. मात्र, प्रत्यक्षात दुसर्‍या तरुणीसोबत लग्नगाठ बांधून त्याने पहिल्या तरुणीची फसवणूक केली. याप्रकरणी खराडी येथील एका 28 वर्षांच्या तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी शांतनू बाळासाहेब महाजन (वय 28, रा. न्याती इलेशिया, थिटेनगर, खराडी) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. हा प्रकार 28 मार्च 2022 पासून गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत सुरू होता.

Back to top button